योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : भाजपचे आमदार नितेश राणे यांना एका समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले आहे. या वक्तव्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांच्याविरोधात नागपुरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी १ सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील शिवाजी चौकात जाहीर सभेला संबोधित केले होते. यावेळी त्यांनी रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ भाष्य करताना एका समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तसेच एका समाजाविरोधात शिवराळ भाषेचा वापर करत कायदा हातात घेण्याची धमकी दिली होती. यावरून मेहराजुन्न नबी कमिटी (पश्चिम) अध्यक्ष मोहम्मद युनूस मोहम्मद युसूफ पटेल (४७, पोलीस लाईन टाकळी) यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी नितेश राणे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५३(२), ३५२, ३०२, २९९, १९६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.