नागपूर : लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी हॅटट्रिक लगावली असून, त्यांच्या नावावर आणखी एक विक्रम जमा झाला आहे. नागपुरातून सलग तिसऱ्यांदा ५४ टक्क्यांहून अधिक मते घेणारे ते पहिले उमेदवार बनले आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात आतापर्यंत केवळ सातवेळाच विजयी उमेदवाराला अर्ध्याहून अधिक मते मिळाली आहेत.
नागपुरात एकूण १२ लाख ७ हजार ४५५ मतदारांनी मतदान केले होते. ४ जून रोजी जाहीर झालेल्या निकालात गडकरी यांना ६ लाख ५५ हजार २७ मते मिळाली. तर विकास ठाकरे यांच्या पारड्यात ५ लाख १७ हजार ४२४ मते आली. गडकरी यांचा १ लाख ३७ हजार ६०३ मतांनी विजय झाला. एकूण मतदानाच्या तुलनेत गडकरी यांना ५४.०८ टक्के मते मिळाली. २०१९ मध्ये त्यांना ५५.६१ टक्के, तर २०१४ मध्ये ५४.१३ टक्के मते मिळाली होती. सलग तीन निवडणुकींत त्यांना ५२ टक्के किंवा त्याहून अधिक मते मिळाली आहेत. याअगोदर काँग्रेसचे विलास मुत्तेमवार यांना १९९८ व १९९९ मध्ये ५० टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती.
सातवेळा विजयी उमेदवाराला अर्ध्याहून अधिक मतेआतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकांत नागपूर मतदारसंघामध्ये विजयी उमेदवारांची एकूण मते ही नेहमी ३५ टक्क्यांहून अधिक राहिली आहेत. १९९८ मध्ये काँग्रेसचे विलास मुत्तेमवार यांना सर्वाधिक ५७.४१ टक्के मते मिळाली होती, तर १९६७ मध्ये काँग्रेसचे एन. आर. देवघरे यांना ३६.६ टक्के मते मिळाली होती. १९८०, १९८४, १९९८, १९९९ व २०१४ मध्ये विजयी उमेदवारांना ५० टक्क्यांहून अधिक मते प्राप्त झाली. गडकरींना २०१९ मध्ये एकूण मतदानाच्या तुलनेत ५५ टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती. यावेळीदेखील गडकरी यांनी अर्ध्याहून अधिक मते मिळविण्याची त्यांची परंपरा कायम ठेवली.
सलग तिसऱ्यांदा सव्वालाखाहून अधिक मताधिक्यमागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा आघाडी घटली असली, तरी मताधिक्याच्या बाबतीतदेखील नितीन गडकरी यांनी विक्रम रचला आहे. सलग तीन निवडणुकींत त्यांचे मताधिक्य सव्वालाखाच्या वर गेले आहे. मागील पाच निवडणुकींची आकडेवारी पाहिली तर मुत्तेमवार यांच्या तुलनेत गडकरी यांना प्रत्येकवेळी चांगले मताधिक्य मिळाल्याचे दिसून आले आहे.
५० टक्क्यांहून अधिक मतं मिळालेले उमेदवार
वर्ष - उमेदवार (पक्ष) - टक्केवारी
१९८० - जांबुवंतराव धोटे (काँग्रेस) - ५३.८५१९८४ - बनवारीलाल पुरोहित (काँग्रेस) - ५२.९९
१९९८ - विलास मुत्तेमवार (काँग्रेस) - ५७.४११९९९ - विलास मुत्तेमवार (काँग्रेस) - ५२.३८
२०१४ - नितीन गडकरी (भाजप) - ५४.१३२०१९ - नितीन गडकरी (भाजप) - ५५.६१
२०२४ - नितीन गडकरी (भाजप) - ५४.०८
मागील पाच निवडणुकींतील मताधिक्य
वर्ष : उमेदवार : मताधिक्य
२००४ : विलास मुत्तेमवार : ९९,४८३
२००९ : विलास मुत्तेमवार : २४,३९९
२०१४ : नितीन गडकरी : २,८४,८४८
२०१९ : नितीन गडकरी : २,१६,००९
२०२४ : नितीन गडकरी : १,३७,६०३