नागपूर : रेल्वे स्टेशनसमोरील टेकडी गणेश उड्डाणपूल हटवून नवीन मार्ग तयार करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, या पुलाखाली असलेल्या दुकानदारांकडून आक्षेप घेण्यात आले आहेत. दुकानदारांच्या मागणीनुसार त्यांना पैसे किंवा जागा देण्यात यावी व हा मुद्दा निकाली काढण्यात यावा, असे निर्देश गडकरींनी मनपा आयुक्तांना दिले. त्यांनी शुक्रवारी या मुद्द्यावर बैठक घेतली.
या बैठकीला आ. प्रवीण दटके, आ. मोहन मते, आ. विकास कुंभारे, मनपा आयुक्त बी. राधाकृष्णन, जिल्हाधिकारी आ. विमला, माजी दयाशंकर तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते. पुलाखालील ७२ जणांनी दुकानाची मागणी केली आहे, तर ७८ जणांना दुकानाचे पैसे पाहिजे आहेत. दुकानदारांना योग्य मोबदला देण्याचा प्रयत्न राहणार आहे. या संदर्भात आयुक्तांनी १५ दिवसांत निर्णय घ्यावा, असेही निर्देश गडकरी यांनी दिले.
बुधवार बाजार शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या कामात सरकारी अडथळा
बुधवार बाजारात उभारण्यात येणाऱ्या शॉपिंग कॉम्प्लेसच्या कामात निर्माण होणाऱ्या अडचणी आयुक्तांनी त्वरित सोडवून या कॉम्प्लेसचे काम लवकर सुरू करावे, अशी सूचना गडकरी यांनी दिली. प्रकल्पाच्या कामाची सुरुवात होण्यासाठी या जागेचे मालमत्तापत्रकच महापालिकेकडे नाही, अशी माहिती देण्यात आली. सिटी सर्व्हे क्रमांक १ चे कार्यालय मनपाला आखिव पत्रिका लवकर देत नाही, याकडे मनपाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. नवीन शहर विकास आराखड्यानुसार जागेत वाढ झाली असल्यामुळे वाढीव जागेसह आखिव पत्रिका पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांसमोरच हा सर्व युक्तिवाद सुरु असल्याने त्यांनी या प्रकरणाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
शुक्रवार तलावाच्या सौंदर्यीकरणाचा खर्च वाढणार शुक्रवार व सोनेगाव तलावाच्या सौंदर्यीकरण कामाचा आढावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी एका बैठकीत घेतला. दोन्ही तलावांच्या सौंदर्यीकरणाचे कामे सुरू झाली आहेत. शुक्रवार तलावाच्या कामावर आतापर्यंत ८ कोटी खर्च झाला आहे. शुक्रवार तलावाचे खोलीकरण करण्याचे काम सुरू आहे. सौंदर्यीकरणाचा ३१ कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यापैकी १२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. खोलीकरणाचे काम करताना होणाऱ्या नुकसानामुळे अतिरिक्त काम करावे लागणार आहे. यामुळे प्रकल्पाची किंमत आता ४४ कोटींपर्यंत जाईल, अशी माहिती बैठकीत अधिकाऱ्यांनी दिली. सोनेगाव तलाव साफ करण्यासाठी तलावातील १५० झाडे तोडण्याची गरज आहे. ही सर्व झाडे बाभळीची आहेत. ही झाडे कापण्यासाठी परवानगीची गरज नाही, अशी माहितीदेखील यावेळी देण्यात आली.