लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजच्या काळात लोक स्वत:पुरता व स्वत:च्या कुटुंबापुरता विचार करताना दिसतात. राजकारणातही अशा स्वत:पुरता विचार करणाऱ्यांचा भरणा अधिक आहे. निवडणुकीची उमेदवारी देताना बायका-मुलांचाच विचार केला जातो. मात्र जे स्वत:च्या पलीकडे जाऊन प्रसिद्धीच्या मागे न जाता सामाजिक जाणिवेने शोषित, पीडितांसाठी कार्य करतात त्यांचे कार्य प्रेरणादायी असते. अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचे कार्य समाजासमोर येणे आवश्यक आहे, जेणेकरून नवी पिढी त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन पुढे चालेल. ही जाणीव समाजाच्याही भल्याची आहे, असे मनोगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.न्यूज-१८ लोकमत वृत्तवाहिनी व हल्दीराम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नागपूर सन्मान २०१९’ या गौरव सोहळ्यात ते बोलत होते. विविध क्षेत्रात कार्य करीत समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या व नागपूरचा सन्मान वाढविणाऱ्या कर्तृत्ववानांचा व गुणवंतांचा नितीन गडकरी व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्याहस्ते गौरविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ गांधीवादी सर्वोदयी कार्यकर्त्या लीलाताई चितळे यांना नागपूर सन्मान जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय उद्योग क्षेत्रात सत्यनारायण नुवाल, साहित्य क्षेत्रात ज्येष्ठ गजलकार हृदय चक्रधर, आधुनिकतेची कास धरत २५० एकरात संत्राबाग फुलविणारे शेतकरी धीरज जुनघरे, भारतीय सैन्यासाठी नवीन मार्शल धून बनविणाऱ्या डॉ. तनुजा नाफडे, शहराच्या भकास भिंतींना आकर्षक रूप देणाऱ्या ‘आय क्लीन’च्या टीमलीडर वंदना मुजुमदार, क्रीडा क्षेत्रात दिव्यांग गटात अनेक सुवर्ण पदके पटकाविणारी अंध जलतरणपटू कांचनमाला पांडे, झिरो ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून सरकारी शाळांचा चेहरा बदलविणारी व वंचितांच्या शिक्षणासाठी झटणारी मैत्रेयी श्रीकांत जिचकार, पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणारी सुरभी जैस्वाल या नऊ जणांना ‘नागपूर सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले.नितीन गडकरी पुढे म्हणाले, आपल्या देशात चांगल्या लोकांचे कर्तृत्व विसरण्याची सवय आहे. ५० वर्षांपूर्वी काय झाले होते, याची माहिती नव्या पिढीला नाही. त्यामुळे अशा पुरस्काराच्या माध्यमातून सेवाकार्याची माहिती पुढे येते. आयुष्य सतत संघर्षाने भरले आहे. कधी यश तर कधी अपयश मिळते. मान-सन्मान, प्रतिष्ठा व अपमानही मिळते. पण जे आपल्या विचाराने कार्य करीत राहतात, अशा चांगल्या लोकांचा सन्मान होणे आवश्यक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी न्या. विकास सिरपूरकर म्हणाले, गुणवंत व कर्तृत्ववान व्यक्तींची खाण असलेले नागपूर आता हिरापूर म्हणून प्रसिद्ध व्हावे.काही प्रसिद्धी मिळविण्यापेक्षा चांगले काही घडावे म्हणून काम करतात. अशांचा गौरव केल्याबद्दल त्यांनी वृत्तवाहिनीचे अभिनंदन केले.पुरस्कारांची निवड करण्यात आलेल्या समितीत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रूपाताई कुळकर्णी, महापालिकेचे माजी अधिकारी सुधीर माटे, अरविंद सोवनी यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन वृत्त निवेदक मिलिंद भागवत यांनी केले.
स्वत:पलीकडची सामाजिक जाणीव रुजविणे आवश्यक : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:30 AM
आजच्या काळात लोक स्वत:पुरता व स्वत:च्या कुटुंबापुरता विचार करताना दिसतात. राजकारणातही अशा स्वत:पुरता विचार करणाऱ्यांचा भरणा अधिक आहे. निवडणुकीची उमेदवारी देताना बायका-मुलांचाच विचार केला जातो. मात्र जे स्वत:च्या पलीकडे जाऊन प्रसिद्धीच्या मागे न जाता सामाजिक जाणिवेने शोषित, पीडितांसाठी कार्य करतात त्यांचे कार्य प्रेरणादायी असते. अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचे कार्य समाजासमोर येणे आवश्यक आहे, जेणेकरून नवी पिढी त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन पुढे चालेल. ही जाणीव समाजाच्याही भल्याची आहे, असे मनोगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देन्यूज १८ लोकमततर्फे उपराजधानीच्या नवरत्नांचा सन्मान