नागपूर : सामान्य नागपूरकरांचा नगरसेवकांवरील रोष विचारात घेता भाजपच्या ६० टक्के नगरसेवकांना उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत आधीच मिळाले आहेत. त्यात प्रभागातील नागरिक म्हणतील त्याच नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी दिली जाईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. यामुळे मागील पाच वर्षांत प्रभागात न फिरकणाऱ्या नगरसेवकांचे टेन्शन वाढले आहे.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक कधी होणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी नितीन गडकरी मात्र आपला गृह जिल्ह्यातील गड वाचविण्यासाठी मागील काही दिवसांपासून सक्रिय झाले आहेत. महापालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन, नागरी सत्कार अशा कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावत आहेत. शुक्रवारी आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमात गडकरी म्हणाले, चांगले काम करणाऱ्यांना संधी मिळते. राजकारण मेट्रोसारखे आहे. स्टेशन आले की प्रवासी उतरतात, नवीन बसतात. राजकारणात माझ्याशिवाय दुसरा नवीन कुणीही येऊ नये, असे वाटणे स्वाभाविक आहे. पण जनता हुशार आहे. तोंडावर कौतुक करतात. मात्र, मतदान पेटीतून कुणाला कौल द्यायचा हे त्यांना माहीत आहे. नगरसेवकांकडून लोकांना अपेक्षा असतात. पण नगरसेवक प्रभागात दिसलाच नाही तर पुन्हा निवडून कसा येणार, असा सवाल गडकरी यांनी केला.
नितीन गडकरी व महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते महामेट्रोचे प्रबंध निदेशक ब्रिजेश दीक्षित, सोलर इंडस्ट्रीजचे प्रबंध निदेशक सत्यनारायण नुवाल, राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेता श्रीनभ अग्रवाल, ज्युनिअर ग्रँडमास्टर चेस संकल्प गुप्ता, स्केटिंग सुवर्णपदक विजेता अद्वेत रेड्डी आदींचा सत्कार करण्यात आला. तर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू मलविका बंसोड व बॉक्सिंग चॅम्पियन अल्फिया पठाण उपस्थित नसल्याने त्यांचे पुरस्कार कुटुंबीयांनी स्वीकारले. ज्येष्ठ विधी तज्ज्ञ व्ही. आर. मनोहर हे आजारी असल्याने त्यांचा घरी जाऊन सत्कार करण्यात येईल.
अध्यक्षस्थानी महापौर दयाशंकर तिवारी होते. व्यासपीठावर उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, सत्ता पक्षनेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त राम जोशी, बसपा गटनेते जितेंद्र घोडेस्वार, क्रीडा सभापती प्रमोद तभाने आदी उपस्थित होते. दयाशंकर तिवारी व अविनाश ठाकरे यांनी मनपाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकास कामांची माहिती दिली. प्रकाश भोयर यांनी आभार व्यक्त केले. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवक, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.