नागपूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज वर्ष २०२२-२३ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर केंद्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरींनी प्रतिक्रिया दिली आहे. हे अंदाजपत्रक देशातील आधुनिक पायाभूत सुविधांच्या वाढीला गती देणारे असून १३० कोटी भारतीयांचे जीवन अधिक सुसह्य करणारे असल्याचे गडकरी म्हणाले.
देशाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच महामार्ग, रेल्वे, वीज, आरोग्य, शिक्षण आणि शेतीशी संबंधित महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांवर करण्यात येत असलेली गुंतवणूक ही मैलाचा दगड असल्याचे सिध्द होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, वर्ष २०२२-२३ मध्ये रस्ते वाहतूक मास्टर प्लॉनला अंतिम रुप देण्यासोबतच शहरी भागात सार्वजनिक वाहतुकीच्या वापरात बदल, शून्य इंधन नीतीच्या निर्णयांमुळे शहरी क्षेत्राला विशेष चालना मिळेल, असेही ते म्हणाले.
अर्थमंत्री श्रीमती सितारामन यांनी या अर्थसंकल्पात पहाडी क्षेत्रात असलेल्या राज्यांमध्ये रोप वे पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देण्यावर जोर दिला आहे. याअंतर्गत ६० किमी लांब ८ रोप वे बनविण्याची योजना आखण्यात आली आहे. रोप वे मार्गातून नवीन पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत. यामुळे कोट्यवधी लोकांसाठी वाहतूक सुव्यवस्थित होईल आणि माल वाहतूक खर्चात कपात होईल, याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले.
२०२२ मध्ये २५ हजार किमी रस्ते निर्माण पूर्ण करण्यासोबतच प्रदूषण रोखण्यासाठी अनेक शहरांमध्ये ई-वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या योजनेचे आपण स्वागत करीत आहोत. तसेच शहरांमध्ये बॅटरी अदलाबदल करण्याच्या धोरणावर भर दिला जाईल. त्यामुळे प्रदूषणापासून दिलासा मिळेल, असे गडकरी म्हणाले.
शेतकरी, महिला आणि युवकांकडे अधिक लक्ष देणार्या या अंदाजपत्रकात पीएम गती शक्ती योजनेच्या माध्यमातून विकासावर अधिक भर देण्यात आला आहे. सरकारच्या धोरणांमुळे देशभरात प्राकृतिक शेतीला प्रोत्साहन मिळेल. तसेच पीपीपी मॉडेल अंतर्गत योजना आणल्या जातील. त्यामुळे शेतकर्यांपर्यंत डिजिटल आणि आधुनिक तंत्रज्ञान पोहोचेल व त्याचा शेतकर्यांना फायदा होईल, असेही गडकरी म्हणाले.