नागपूर : विकासाच्या दृष्टीने गत काळात नागपूर शहरातील विविध प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. मात्र, यातील अनेक प्रकल्प वर्षानुवर्षे रखडलेले आहेत. हे प्रकल्प का थांबले, याचा आढावा घेऊन अशा प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी बैठकीत दिले.
महाल भागातील केळीबाग रोडच्या रुंदीकरणासाठी भूसंपादन जवळपास झाले आहे. काही अडचणी कायम आहेत. पारडी उड्डाणपूल, जुना भंडारा रोड रुंदीकरण ही कामे रखडली आहेत. अजनी-सोमलवाडा, रामजी पैलवान या रस्त्यांची कामे रखडलेली आहेत. महाल येथील व्यावसायिक संकुलाचा प्रकल्प मागील काही वर्षांपासून कागदावरच आहे. आता या प्रकल्पांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने नव्याने प्रकल्प अहवाल मंजूर करावे लागतील. अशा अडचणी दूर करून प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश नितीन गडकरी यांनी दिले. बैठकीला आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्यासह महामेट्रो, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.टेकडी उड्डाणपुलाचा प्रकल्प संथ
टेकडी उड्डाणपुलाचा पूल तोडून येथे चौपदरी रस्ता व विकास कामे केली जाणार आहेत. मेट्रोने किती दुकाने बांधली, येथे पुलाखालील किती दुकानदारांचे पुनर्वसन करण्यात आले, किती दुकानदारांनी या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे? याबाबतचा आढावा घेऊन हा प्रकल्प गतीने राबविण्याचे निर्देश नितीन गडकरी यांनी दिले.