नागपूर-
राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर राज्यात भाजपामध्ये खांदेपालट झाला. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली तर मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची वर्णी लागली आहे. बावनकुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये आज त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे इतर महत्वाचे नेते उपस्थित होते. सर्वांनी बावनकुळे यांचा आजवरचा जीवनप्रवास उलगडून सांगितला आणि त्यांचं अभिनंदन केलं. पण सर्वाधिक लक्ष वेधलं ते म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणानं. गडकरींनी आपल्या स्टाइलमध्ये तुफान फटकेबाजी यावेळी केली.
"आपल्यातला एक कार्यकर्ता आज महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे. तुम्हाला माहितच आहे जो प्रदेशाचा अध्यक्ष होतो तो पुढे काय काय होतो. म्हणजे मी मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा देत नाहीय बरं, नाहीतर मीडियामध्ये माझ्या नावानं जे मी बोललो नाही ते माझ्या नावावर खपवून देतात. फडणवीसच मुख्यमंत्री झाले पाहिजेत, पण ते केंद्रात गेल्यावर नंतर बावनकुळे तुमचा विचार होऊ शकतो", असं नितीन गडकरी मिश्किलपणे म्हणाले आणि सभागृहात एकच हशा पिकला. भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी बावनकुळेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीलाही सुरुवात केली.
"बावनकुळेंना येणाऱ्या काळामध्ये पक्षाची सेवा करण्याची संधी आहे. तसंच त्यांच्या कतृत्वालाही वाव मिळणार आहे. हा पक्ष कार्यकर्त्याचा पक्ष आहे. पिता-पुत्राचा किंवा आई-मुलाचा हा पक्ष नाही. एक ऑटोरिक्षा चालवणारा सामान्य माणूस आज महाराष्ट्राचा अध्यक्ष झाला तो आपल्या कतृत्वानं आणि कामानं. हे भाजपाचं वैशिष्ट्य आहे. एका कार्यकर्त्याचा सन्मान होणं हे माझ्यासहीत देवेंद्र फडणवीसांसहीत सर्व कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा विषय आहे", असं नितीन गडकरी म्हणाले.
महाराष्ट्राचं भविष्य बदलण्याची भाजपामध्ये ताकद"बावनकुळे जरी महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष झाले असले तरी त्यांना नागपूर जिल्ह्यामध्ये शासकीय कामांमध्येही लक्ष द्यावं आणि मदत करावी एवढी मी त्यांना नक्कीच विनंती करेन. कारण त्यांना हे प्रश्न माहित आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पक्षाला येणाऱ्या काळामध्ये आपली शक्ती वाढविण्याची गरज आहे. कारण महाराष्ट्राचं भविष्य बदलवण्याची ताकद जर कोणत्या पक्षात असेल तर ती ताकद फक्त भाजपामध्येच आहे. त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली शासनाचं काम तर होणारच आहे. पण तेवढं संघटन देखील मजबूत झालं पाहिजे. दोन्ही ताकदीतून पक्षाचा विस्तार आपल्याला करायचा आहे", असंही नितीन गडकरी म्हणाले.