नगपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे कामासोबतच त्यांच्या मनमोकळ्या स्वभावासाठीही ओळखले जातात. नुकतंच त्यांनी रस्त्यासंबंधी एक भन्नाट किस्सा सांगितला. त्यांच्या किस्सा सांगण्याच्या शैलीने उपस्थितांचे चेहरे हास्याने फुलले.
शुक्रवारी नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते. आपण देशभरात रस्ते बांधले पण स्वत:च्या घरासोमोर दोन किमीचा रस्ता बांधतानाच अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या घरासमोरचा रस्ता पूर्ण झाला नसल्याने ६ वर्ष झाली आपण महालमध्ये असलेल्या घरी गेलो नसल्याचेही यावेळी ते म्हणाले. त्यांनी ही खंत बोलून आपल्या खास शैलीत बोलून दाखवली.. ते ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
दिल्ली एक्सप्रेस वे हा एक लाख कोटी रुपयांचा रस्ता दोन वर्षांत झाला पण माझ्या घरासमोरचा मुधोजीराजे रस्ता करता करता पार थकून गेलो. त्या रस्त्याच्या कामाबाबत न्यायालयात अनेकदा अर्ज जातात आणि न्यायालयातून त्याला स्थगिती येते, असे गडकरी बोलताना म्हणाले.
पुढे गडकरी बोलताना म्हणाले, नागपूर मेट्रो भारतातील सर्वोत्कृष्ट मेट्रो आहे. नागपूर मेट्रोचं डिझाईन चांगलं आहे. भांडवली खर्च कमी आहे. इतर मेट्रो प्रति किमी ३५० कोटीच्या भांडवली खर्चातून बांधलेली आहे. मात्र, आपली मेट्रो २०० कोटी प्रति किमी खर्चाने बांधलेली आहे. पुढची मेट्रो लोकांच्या पैशांची बनवायची नाही.