नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ठार मारण्याची धमकी देऊन १०० कोटी रुपये खंडणी मागण्यात आल्यामुळे धंतोली पोलिसांनी आरोपी जयेश ऊर्फ शाहीर ऊर्फ शाकीर शशिकांत पुजारी याच्याविरुद्ध दोन एफआयआर नोंदविले आहेत. त्यापैकी दुसऱ्या प्रकरणामध्ये पुजारीविरुद्ध सक्षम न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यासाठी तपास अधिकाऱ्याला शुक्रवारी ५० दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली.
सहायक पोलिस आयुक्त नीलेश पालवे हे या प्रकरणांचा तपास करीत आहेत. त्यांनी यूएपीए कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात अर्ज दाखल करून ९० दिवसांची मुदत वाढवून मागितली होती. परंतु, न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता त्यांना ५० दिवसांचीच मुदत वाढवून दिली. या प्रकरणांत पहिल्या ९० दिवसांमध्ये सक्षम न्यायालयात आरोपपत्र दाखल करणे बंधनकारक होते. परंतु, काही कारणांमुळे प्रकरणांचा तपास पूर्ण होऊ शकला नाही. पालवे यांना पहिल्या प्रकरणातही आरोपपत्र दाखल करण्यासाठी ५० दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. त्यासंदर्भात गेल्या २६ जून रोजीचा आदेश जारी करण्यात आला आहे.
कर्नाटक येथील बेळगाव कारागृहात असताना पुजारीने आधी १४ जानेवारी आणि त्यानंतर २१ मार्च २०२३ रोजी गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. तसेच, १०० कोटी रुपयाची खंडणी मागितली, अशी तक्रार आहे. पुजारीला ३ एप्रिल २०२३ रोजी अटक करून नागपूरला आणण्यात आले. पुजारीतर्फे ॲड. नितेश समुंद्रे यांनी कामकाज पाहिले.