नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपुरातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. भाजपची यादी जाहीर झाल्यावर काही वेळातच भाजपचे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धंतोली येथील भाजपच्या विभागीय कार्यालयासमोर जोरदार जल्लोष केला.
नितीन गडकरी यांचे पहिल्या यादीत नाव नसल्याने विविध चर्चांना उधाण आले होते. मुंबईतून निरीक्षक आल्यावरदेखील भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नितीन गडकरी हेच नागपुरचे उमेदवार असतील अशी एकमताने भूमिका मांडली होती. महाराष्ट्राची यादी कधी जाहीर होते याकडेच भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास सर्व पदाधिकारी धंतोलीत एकत्रित आले. ढोलताशांच्या गजरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी मिठाईदेखील वाटण्यात आली.
जल्लोषात आ.कृष्णा खोपडे, आ.मोहन मते, आ.विकास कुंभारे, आ.मोहन मते, भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे, विदर्भ संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, गुड्डू त्रिवेदी, राम अंबुलकर, विष्णू चांगदे, चंदन गोस्वामी, बाल्या बोरकर, श्रीकांत आगलावे, रितेश गावंडे, वर्षा ठाकरे, मनिषा काशीकर, गजेंद्र पांडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
१० वर्षांपासून नागपुरच्या विकासासाठीच प्रयत्न : गडकरीदरम्यान, नागपुरातून उमेदवारी जाहीर झाल्यावर नितीन गडकरी यांनी सोशल माध्यमांतून त्यांची भावना मांडली. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने माझ्यावर परत विश्वास दाखविला आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष जे.पी.नड्डा व निवडणूक समितीचे धन्यवाद. मागील १० वर्षांपासून मी नागपुरच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न केले आहेत. जनतेच्या प्रेम व समर्थनातून हे काम पुढेदेखील सुरू ठेवेन, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले.