लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरचा चेहरामोहरा बदलण्याचे ‘व्हिजन’ दाखविणारा केंद्रीय मंत्री व भाजप-शिवसेना महायुतीचे नागपुरातील उमेदवार नितीन गडकरी यांचा वचननामा जाहीर झाला आहे. यानुसार पुढील पाच वर्षांत नागपुरात नवे वैद्यकीय महाविद्यालय, ‘डिफेन्स मटेरियल’ उत्पादनाचे ‘हब’, ‘रेडिमेड गार्मेंट झोन’, स्वदेशी ‘मॉल’ उभारण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. सोबतच नागपूरची विशेष ओळख असलेल्या या ‘सावजी’ जेवणाचे राष्ट्रीय पातळीवर ‘ब्रॅन्डिंग’साठीदेखील प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.वचननाम्यामध्ये सर्वाधिक भर हा पायाभूत सुविधांचा विकास व रोजगार निर्मितीवर देण्यात आला आहे. शहरात कौशल्य विकास केंद्र तसेच अत्याधुनिक रोजगार मार्गदर्शन केंद्र उभारण्यात येईल. मिहानमध्ये गुंतवणूक आणून उद्योगधंदे वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल व तेथे नागपुरातील तरुणाईला रोजगार मिळेल यावर लक्ष देण्यात येईल. दरवर्षी किमान ५० हजार तरुण-तरुणींना रोजगार मिळेल, अशी व्यवस्था उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. बंगळुरु व पुण्याच्या धर्तीवर आयटी पार्क विकसित करण्याचा प्रयत्न असेल. तसेच खासदार निधीतून एमपीएससी, युपीएससी परीक्षांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येईल. पोलीस व सैन्य भरतीसाठी तरुणांना बाराही महिने मार्गदर्शन देणारे विशेष केंद्र स्थापन करण्यात येईल. अनुसूचित जाती-जमाती तसेच मुस्लिम तरुण-तरुणींसाठी कौशल्य विकासांतर्गत विशेष मार्गदर्शन केंद्र उभारून त्यांना रोजगाराभिमुख करण्यात येईल, असेदेखील या वचननाम्यातून सांगण्यात आले आहे.
सावजीचे ‘ब्रॅन्डिंग’ अन् गरिबांसाठी खासदार ‘थाळी’सावजी भोजनाचे देशातील अनेक भागात आकर्षण आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘सावजी पॅटर्न’चे सरकारमार्फत ‘ब्रॅन्डिंग’ करण्यात येईल. तसेच देशात किमान एक हजार ठिकाणी सावजी ‘रेस्टॉरन्टस्’ उभारण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल. शिवाय वंचित, गरिबांसाठी ‘खासदार थाळी’ सुरू करण्याचा विचार आहे. शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येईल, असे वचननाम्यातून सांगण्यात आले आहे.
‘जीएसटी’बाबत तोडग्यासाठी सरकारकडे आग्रह करणारवचननाम्यातील बाबींनुसार ‘जीएसटी’ प्रणालीचे सुलभीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यासंदर्भात दिलासादायक तोडगा निघावा यासाठी सरकारकडे आग्रह करण्यात येईल. ‘रिटेलर्स’ला ‘एलबीटी’च्या बजाविण्यात आलेल्या नोटिसा वैधता तपासून रद्द कशा करता येईल, यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील.
शहरात आणखी एक सरकारी वैद्यकीय महाविद्यालयनागपूर शहरातील रुग्णाला उपचारासाठी नागपूरबाहेर जावे लागणार नाही, त्यादृष्टीने आरोग्य सुविधा उभारण्यात येतील. गरीब रुग्णांना वेळेवर व परवडेल अशा दरात उपचार उपलब्ध करून देण्यात येतील. हलाखीच्या स्थितीतील वंचित कॅन्सर व हृदयरोग्यांना मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. शिवाय शहरात आणखी एक सरकारी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. दिव्यांग बांधवांसाठी शहरात कृत्रिम पाय तयार करण्याच्या दृष्टीने व्यवस्था उभारण्यात येईल, असे वचननाम्यातून आश्वासन देण्यात आले आहे.वर्धा मार्गाचा ‘ज्ञानसमृद्धी’ मार्ग म्हणून विकासनागपुरात राष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक संस्था आल्या आहेत. वर्धा मार्गाला ‘ज्ञानसमृद्धी’ मार्ग म्हणून विकसित करणार. या मार्गाच्या विकासासाठी निवडक व नामांकित शैक्षणिक संस्थांना आमंत्रित करुन नागपूरला शैक्षणिक हब म्हणून विकसित करणार. नागपुरात अद्ययावत भाषा प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येईल, असे वचननाम्यातून मांडण्यात आले आहे.
मिहानमध्ये ‘डिफेन्स मटेरियल’ उत्पादनाचे ‘हब’‘मिहान’च्या विकासासाठी तेथे ‘डिफेन्स मटेरियल’ उत्पादनाचे ‘हब’ तयार करण्यासाठी प्रयत्न करणार. या माध्यमातून रोजगारनिर्मिती देखील होईल; सोबतच ‘मिहान’मध्ये आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर स्थापन करण्यात येईल. लोकसभा निवडणुकानंतर कामाला सुरुवात होईल व १० हजार तरुणांना येथे थेट रोजगार मिळेल. तसेच ‘एम्प्रेस मिल’च्या जागेवर ‘रेडिमेड गारमेंट झोन’ तयार करण्यात येईल. येथे उत्पादन व विपणनाची सोय असेल.
विमानसेवेचा विस्तार करणारविमानतळाचा विस्तार करून विमानसेवेचा देखील विस्तार करण्यात येईल. नागपूर ते जयपूर, पाटणा, भुवनेश्वर, रांची, गोवा, अमृतसर, चंदीगड या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यात येईल, असेदेखील वचननाम्यात नमूद आहे.
स्वदेशी ‘मॉल’ उभारणारमहिला बचत गटांना संरक्षण मिळावे, स्वदेशी वस्तूंना बाजारपेठ मिळावी व विक्रीत वाढ व्हावी, यासाठी शहरात ठिकठिकाणी स्वदेशी मॉल उभारण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. सेंद्रिय पद्धतीच्या शेतीतील अन्नधान्य, फळे, भाजीपाला यातून विक्रीला ठेवण्यात येईल, असे वचननाम्यात नमूद करण्यात आले आहे.
दळणवळण सुविधेचा विस्ताररेल्वेमार्गाचा विस्तार करण्यात येईल. नागपूर-रिवादरम्यान रोज एक गाडी सायंकाळी नागपूरहून सुटेल. हमसफर नागपूर-पुणे दैनिक करण्यात येईल. नागपूर ते जयपूर, जोधपूर, जैसलमेरपर्यंत यात्रा सुनिश्चित करण्यात येईल. नागपूर-दिल्ली मार्गावरील गाड्यांचा कोटा वाढविण्यात येईल. महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये आधुनिक बदल होतील. नागपूर व अजनी रेल्वेस्थानकाचा विकास होईल, असा वचननाम्यातून संकल्प करण्यात आला आहे.