नागपूर : हिंदू असणं पाप आहे का? पाकिस्तानमध्ये आधी १९ टक्के हिंदू होते. आता तेथे केवळ ३ टक्के हिंदू आहेत. मुस्लीम नागरिकांना शरणार्थी म्हणून आश्रय देण्यासाठी जगात १०० ते १५० देश आहेत. मात्र, हिंदू, बौद्ध, शीख, ईसाई, जैन, पारशी नागरिकांना आश्रय देण्यासाठी कुठलाही देश नाही, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ उपराजधानीत रविवारी यशवंत स्टेडियम ते संविधान चौक रॅली काढण्यात आली. लोकाधिकार मंचतर्फे काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये सर्वधर्मीय नागरिक सहभागी झाले होते. नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. आम्ही जातीय भेदाभेद मानत नाही. समाजातून अस्पृश्यता व जातीयवाद आम्हाला दूर करायचा आहे. राममंदिराची पहिली शिळा अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्याने ठेवली होती. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आजवर आपल्या देशाने जगाला सहिष्णुता शिकविली आहे. त्यामुळे आम्हाला कुणी सहिष्णुता शिकवू नये. केवळ मतांच्या राजकारणातून नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल लोकांमध्ये भीती व संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. हिंदू ही जीवन जगण्याची पद्धत आहे, हे हिंदूंना जातीवादी म्हणणाऱ्यांनी समजून घ्यायला हवे. नागरिकत्व कायदा हा भारतीय मुस्लिमांच्या विरोधात नाही. भारतीय मुस्लिमांवर कधीही अत्याचार होऊ देणार नाही. त्यामुळे कुणीही अपप्रचारात फसू नये, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. या देशातील एकाही नागरिकाने या कायद्यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही. भारतीय मुस्लिमांवर कधीही अत्याचार होऊ देणार नाही. त्यामुळे कुणीही अपप्रचारात फसू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.नागपुरात समर्थनार्थ रॅली :नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ उपराजधानीत रविवारी भव्य रॅली काढण्यात आली. लोकाधिकार मंचतर्फे काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये सर्वधर्मीय नागरिक सहभागी झाले होते. रॅलीमध्ये २० हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे विविध जाती पंथांचे नागरिक या रॅलीत उपस्थित होते. भव्य तिरंगा रॅलीचे खास आकर्षण ठरला.