सुनील केदारांच्या ‘एअरो मॉडेलिंग शो’ला राऊत यांची लँडिंगच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2022 10:52 AM2022-03-29T10:52:06+5:302022-03-29T11:05:59+5:30
पालकमंत्री रविवारी नागपुरातच होते. मात्र, ते या कार्यक्रमाकडे फिरकलेच नाही. मंचावरील त्यांची खुर्ची रिकामीच राहिली. या कार्यक्रमात उपस्थित राजकीय नेत्यांमध्ये या रिकाम्या खुर्चीवरून चांगलीच चर्चा रंगली.
कमलेश वानखेडे
नागपूर : पालकमंत्री नितीन राऊत व क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यातील मानसन्मानाचे नाट्य पुन्हा एकदा रंगताना दिसत आहे. केदार यांनी पुढाकार घेत रविवारी मानकापूर स्पोर्ट्स स्टेडियम येथे ‘एअरो मॉडेलिंग शो’ आयोजित केला. मात्र, राऊत यांनी या कार्यक्रमाला अखेरपर्यंत हजेरीच लावली नाही. मंचावर पालकमंत्र्यांची रिकामी खुर्ची राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.
विद्यार्थी व मुलांना शालेय जीवनापासूनच उड्डयण क्षेत्राबाबत आकर्षण निर्माण व्हावे, या हेतूने क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी नागपुरात ‘एअरो मॉडेलिंग शो’ घेण्याचा निर्णय घेतला. पुढाकार घेत यंत्रणा कामाला लावली. प्रशासनासह प्रमुख राजकीय व्यक्तींनाही या शोसाठी निमंत्रित केले. मात्र, प्रत्यक्ष कार्यक्रमाला पालकमंत्री राऊत पोहोचलेच नाही. पालकमंत्री रविवारी नागपुरातच होते. मात्र, ते या कार्यक्रमाकडे फिरकलेच नाही. मंचावरील त्यांची खुर्ची रिकामीच राहिली.
या कार्यक्रमात उपस्थित राजकीय नेत्यांमध्ये या रिकाम्या खुर्चीवरून चांगलीच चर्चा रंगली. पालकमंत्री का आले नाही, याचा कानोसा घेतला असता पुन्हा एकदा मान-सन्मानाचा मुद्दा समोर आला. पालकमंत्र्यांना या कार्यक्रमाचे प्रशासनाकडून निमंत्रण गेले होते. मात्र, केदार यांनी पालकमंत्र्यांना निमंत्रित करण्यासाठी स्वत: एक फोनही केला नाही. त्यामुळे पालकमंत्री नाराज झाले. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांमध्ये सुसंवाद असावा. एकमेकांना सन्मान देत पुढाकार द्यावा, अशी सूचक प्रतिक्रिया पालकमंत्र्यांच्या गोटातून मिळाली. याबाबत प्रत्यक्ष पालकमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला असता पहाटे एका कार्यक्रमाला हजर राहिल्यानंतर थकवा जाणवल्यामुळे पालकमंत्री ‘एअरो मॉडेलिंग शो’ला जाऊ शकले नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
केदारांचे वक्तव्य मंत्रिमंडळाबाहेर गेले कसे ?
मंत्रिमंडळाच्या गेल्या बैठकीत सुनील केदार यांनी भाजप नेत्यांबद्दल संताप व्यक्त केला होता. आपल्याला अधिकार दिले तर आपण त्यांना वठणीवर आणू, असे त्यांनी बैठकीत ठासून सांगितले. मात्र, मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेली ही गोपनीय चर्चा बाहेर प्रसिद्धी माध्यमांपर्यंत पोहोचली, ती नेमकी कुणी पोहोचविली? याचा शोध केदार हे घेत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.