नागपूर : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे शिवसेनेला संपवायला चालले होते, असा आरोप शिवसेनेतील बंडखोर सातत्याने करताहेत. बंडखोरांचा हा आक्षेप होता तर मग हे बंडखोर अडीच वर्षे महाविकास आघाडीमध्ये राहिले कसे, असा सवाल काँग्रेसचे नेते व माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी येथे केला.
प्रेस क्लबतर्फे आयोजित ‘मिट द प्रेस’ या कार्यक्रमात नितीन राऊत यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना शिवसेनेतील बंडखोरांकडून होत असलेल्या आरोपांबाबत विचारले असता त्यांनी उपरोक्त सवाल केला. राऊत म्हणाले, शिवसेनेत जे झाले ते दुर्दैवी आहे. त्याबाबत मी अधिक बोलू शकत नाही; परंतु जे घडलं ते दुर्दैवी आहे.
यावेळी त्यांनी त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कामांबाबतही सांगितले. कोरोनामुक्त नागपूर आणि महापारेषण, महानिर्मिती व महावितरण या तिन्ही वीज कंपन्या फायद्यात आणण्याचे महत्त्वाचे कार्य आपल्या कार्यकाळात झाले. याशिवाय अनेक प्रकल्प मार्गी लावण्यात यश आले. आपण आपल्या कार्यकाळात कुणाशीही दुजाभाव केला नाही. विकासकामाला प्राधान्य दिले, याचे समाधान आहे, असे राऊत म्हणाले.
देशभरात कोळशाची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. वीज संकट निर्माण झाले. अनेक राज्यांमध्ये लोडशेडिंग जाहीर झाले; परंतु महाराष्ट्रात आपण लोडशेडिंग होऊ दिले नाही. यासोबतच राज्यात ३० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार केले. त्यापैकी ५ हजार कोटींची गुंतवणूक विदर्भातील आहे. यात सहा कंपन्या विदर्भात येणार असून, ४ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल. यासोबतच डॉ. आंबेडकर कन्वेंशन सेंटर पूर्णत्वास आले. डॉ. आंबेडकर रुग्णालयाचे श्रेणीवर्धन केले. लोकसंवादच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, जोसेफ राव व ज्येष्ठ संपादक एस.एन. विनोद उपस्थित होते.