विजय वडेट्टीवार यांच्या पहिल्याच बैठकीकडे राऊत-चतुर्वेदी यांनी फिरविली पाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 11:50 AM2023-08-12T11:50:20+5:302023-08-12T11:51:47+5:30
काँग्रेसची लोकसभा निवडणुकीची तयारी : नागपूर, रामटेकचा आढावा
नागपूर :काँग्रेसने निरीक्षक व समन्वयक नियुक्त करून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. निरीक्षक म्हणून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघातील स्थितीचा आढावा घेतला. परंतु या बैठकीकडे माजी मंत्री नितीन राऊत व सतीश चतुर्वेदी या दोन वजनदार नेत्यांनी पाठ फिरवल्याने काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.
नितीन राऊत यांच्याशी आधीच चर्चा झाली आहे. ते नागपुरात नसल्याने कार्यक्रमाला उपस्थित नाहीत. परंतु पुढच्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी पत्रकारांना दिली. मात्र राऊत यांच्या अनुपस्थितीची कार्यक्रमात चर्चा होती. वडेट्टीवार यांनी यावेळी भाजपवर हल्ला चढविला. देशाची वाटचाल गुलामगिरी व हुकूमशाहीकडे सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार आता मोदी सांगतील तसेच पोपटासारखे बोलतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धर्माधर्मात विभाजन करण्याचे काम करीत आहे. तर काँग्रेस सर्वधर्म समभावाच्या विचारावर चालत आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३८ जागा मिळतील, असाच सर्व्हेचाही अंदाज असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला.
आगामी लोकसभा निवडणूक देशासाठी व लोकशाहीकरिता महत्त्वाची ठरणार आहे. ३ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात काँग्रेस यात्रा काढणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली. पहिल्या सत्रात नागपूर लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, माजी मंत्री अनीस अहमद, गिरीश पांडव, बबनराव तायवाडे, विशाल मुत्तेमवार, अतुल कोटेचा, बंटी शेळके आदी व्यासपीठावर उपस्थित होते. काँग्रेस लोकसभा निवडणुसाठी काँग्रेस सज्ज असल्याचे विकास ठाकरे यांनी सांगितले. विलास मुत्तेमवार म्हणाले, नागपुरात डबल इंजिनचा कारभार आहे, पण काँग्रेसही मजबूत आहे.
काँग्रेसचा रामटेकवर दावा
रामटेक लोकसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला असल्याने महाविकास आघाडीच्या जागा वाटपात या जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दावा आहे. परंतु आढावा बैठकीत काँग्रेसने रामटेक लढविण्याचा व जिंकण्याचा निर्धार केला आहे. या जागेवरून महाविकास आघाडीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
विजय वडेट्टीवार यांनी रामटेक लोकसभा मतदार संघातील पक्षबांधणीचा आढावा घेतला. यावेळी माजी मंत्री सुनील केदार, जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, आमदार राजू पारवे, जि. प. उपाध्यक्षा कुंदा राऊत आदींनी मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, आमदार अभिजीत वंजारी, जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, माजी आमदार एस. क्यू. जमा, किशोर गजभिये, रवींद्र दरेकर, अवंतिका लेकुरवाळे, मिलिंद सुटे, राजकुमार कुसुंबे, संजय मेश्राम आदी व्यासपीठावर होते. यावेळी जि. प. सदस्य, जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.