लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ मुळे उत्पन्नाला बसलेला फटका, शासनाकडून विशेष अनुदान मिळण्याची अपेक्षा नसल्याने गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत ४७६.८७ कोटीचा कट असलेला महापालिकेचा सन २०२०-२१ या वर्षाचा २,७३१ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी मंगळवारी ऑनलाईन विशेष सभेत सादर केला. सुुरुवातीची शिल्लक २३१ कोटींची असून पुढील वित्त वर्षात २५०० कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. तर आर्थिक वर्षात २७३०.७५ कोटींचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे.
वास्तव उत्पन्न विचारात घेता अर्थसंकल्पाला कट लागल्याने याचा प्रस्तावित विकास कामांवर परिणाम होणार आहे. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कार्यादेश झालेल्या कामांना लावलेला ब्रेक, त्यात कोविड-१९ मुळे एप्रिल महिन्यापासून विकास कामे जवळपास ठप्पच आहेत. याचा विचार करता कार्यादेश झालेली व प्रलंबित विकास कामांना निधी उपलब्ध करून ती तातडीने सुरू करण्याचा मनोदय पिंटू झलके यांनी व्यक्त केला. अर्थसंकल्पात विशेष अशा नवीन योजनांचा समावेश नाही. प्रलंबित व रखडलेल्या विकासकामांना पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे.
स्थानिक संस्था कर (एलबीटी) संपुष्टात आला आहे परंतु थकबाकीतून २.५ कोटी अपेक्षित आहे. राज्य सरकारकडून जीएसटी व महसुली अनुदानातून १४११.२१ कोटी मिळतील. मालमत्ताकरापासून २२३.३५ कोटी अपेक्षित आहेत. पाणीपट्टीतून १७५ कोटींची वसुली अपेक्षित आहे. बाजार विभागाकडून १४.७५ कोटी तर स्थावर विभागापासून १२.०५ कोटींचा महसूल जमा होईल. मालमत्ताकरानंतर महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या नगररचना विभागाकडून ११०.५ कोटी अपेक्षित आहेत. लोककर्म बीओटी प्रकल्पातून २.०१ कोटी तर विद्युत विभागामुळे २५.०५ कोटी मिळण्याची आशा आहे. भांडवली अनुदान स्वरुपात २०९.२० कोटी तर भांडवली कर्ज स्वरूपात १७८ कोटी, निरपेक्ष ठेवीच्या माध्यमातून ६३.३८ कोटी गृहीत धरण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी तत्कालीन अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी ३१९७.६० कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. या तुलनेत ४७६.८७ कोटींनी यंदाचा अर्थसंकल्प कमी आहे.
शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण, दुरुस्ती व पंडित दीनदयाल उपाध्याय अंतर्गत रस्ते सुधार कार्यक्रमांतर्गत शहरातील रस्ते विकास व सुधारणा कार्यक्रमांसाठी १३०. ३४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. एकात्मिक रस्ते सुधार कार्यक्रमांतर्गत पहिल्या व तिसऱ्या टप्प्यातील शिल्लक सिमेंट रोडसाठी १८३.१९ कोटी प्रस्तावित आहे. विकास आराखड्यानुसार डी.पी.रोडसाठी १२.५० कोटी, केळीबाग रोडसाठी २५ कोटी, गीतांजली चौक ते गांधीसागर तलावापर्यंतच्या भूअर्जनासाठी १४.५० कोटी, खेडे विभागाच्या सुधारणासाठी ११.५९ कोटी,पुतळ्याचे निर्माण २.५० कोटी, श्रीमंत राजे रघुजी भोसले नगरभवन संभाग टाऊन हॉलसाठी ५ कोटी, बाजार विकास व मटणमार्केटसाठी १० कोटी, अनधिकृत ले-आऊट विकासासाठी २३.७५ कोटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकासाठी २ कोटी, बाळासाहेब स्मृती शैक्षणिक कला, क्रीडा व सांस्कृतिक केंद्र निर्माण यासाठी ७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील एलईडी पददिव्यांसाठी ९२.३० कोटी, क्रीडा विकास १८.२७ कोटी, अग्निशमन विभागासाठी ३१.५० कोटी, नगरसेवकांना वॉर्डातील कामासाठी ४५.४७ कोटी, ऑरेंज सिटी स्ट्रीटसाठी २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
उत्पन्नाची बाजु
विभाग उत्पन्न(कोटीत)
स्थानिक संस्था कर २.५०
एलबीटी व व महसुली अनुदान १४११,२१
मालमत्ताकर २२३.३५
पाणीकर १७५.००
बाजार वसुली १४,७५
स्थावर विभाग १२.०५
अग्निशमन विभाग ३.०४
नगररचना ११०.५०
आरोग्य विभाग ७.३९
लोककर्म २.०१
विद्युत विभाग २५.०५
हॉटमिक्स २.२५
महसुली अनुदान २०९.२०
इतर विभागांकडून महसूल ४५.२१
भांडवली कर्ज १७८.००
निरपेक्ष व ठेवी ६३.३८
अग्रीम उत्पन्न १२.०२