नागपूर : महापालिकेच्या प्रभाग रचनेचा आराखडा मंगळवारी जाहीर झाला. तीन सदस्यीय प्रभाग पद्धत डोळ्यासमोर ठेवून एकूण ५२ प्रभागांत नागपूर शहराची विभागणी करण्यात आली आहे. प्रभाग रचनेनंतर जवळपास ७० टक्के नगरसेवकांचा पुन्हा लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रभागांची नवी रचना ही २००२ मधील तीन सदस्यीय प्रभागाशी मिळतीजुळती असल्यामुळे माजी नगरसेवकांमध्येही जोश संचारला आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मंगळवारी सकाळी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर करण्यात आला. महापालिकेच्या सिव्हिल लाईन्स कार्यालयाच्या हिरवळीवर प्रभाग रचनेसह नकाशे लावण्यात आले. आपली वस्ती नेमकी कोणत्या प्रभागात गेली हे पाहण्यासाठी राजकीय कार्यकर्त्यांसह कर्मचाऱ्यांनीही गर्दी केली होती.
व्हायरल आराखडा फेक
- काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या प्रभाग रचनेचा आराखडा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तो आराखडा खरा असल्याचा दावा करीत राजकीय कार्यकर्त्यांनी तयारी चालविली होती. त्यावेळी महापालिका प्रशासनाने संबंधित आराखडा फेक असल्याचे स्पष्ट केले होते. मंगळवारी आराखडा जाहीर झाल्यानंतर महापालिकेचा दावा खरा ठरला.
आरक्षणाचे चित्र अस्पष्ट -
ओबीसी आरक्षणाचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नसल्यामुळे प्रभागातील एकूणच आरक्षणाचे चित्र स्पष्ट होऊ शकले नाही. २ मार्चपर्यंत प्रभाग रचनेला अंतिम रूप दिले जाईल. यानंतर निवडणूक आयोगातर्फे प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे आरक्षणही जाहीर झालेले नाही. मात्र, प्रभाग रचनेसोबत या दोन्ही संवर्गातील लोकसंख्या जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्या प्रभागात संबंधित आरक्षण येईल, हे जवळपास उघड झाले आहे. महिला आरक्षणाची सोडत झाल्यानंतर प्रभागाचे अंतिम चित्र समोर येईल. आरक्षणाबाबत अद्याप कुठलेही दिशानिर्देश प्राप्त झालेले नाहीत, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
- ५२ प्रभागात १५६ जागेवर होणार निवडणुका
- ७८ जागा महिलांसाठी आरक्षित, २६ जागेवर २ महिला उमेदवार राहील
- ३१ जागा अनुसूचित जाती, १२ जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित, प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलेल्या जागांचे महिला आरक्षण निघणार
- निवडणूक आयोगाकडून अधिकृत अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण घोषित केले नाही. मात्र लोकसंख्येच्या आधारे राजकीय पक्षाने एससी व एसटीसाठी आरक्षित होणाऱ्या जागांची संभाव्य यादी तयार केली आहे.
- प्रभाग १ ची सुरुवात उत्तर नागपुरातील नारा येथून होत आहे. अखेरचा म्हणजे ५२ वा प्रभाग दक्षिण-पश्चिम नागपुरातील आहे. सुरुवातीचे ४ प्रभाग उत्तर नागपूर व त्यानंतरचे ३ प्रभाग पूर्व नागपुरात येत आहे.
प्रभाग ५१ लोकसंख्येने मोठा, प्रभाग १४ सर्वात लहान
- ९ प्रभागांची लोकसंख्या ५० हजारांहून अधिक आहे. यात सर्वाधिक लोकसंख्येचा ५१ क्रमांकाचा प्रभाग आहे. येथील लोकसंख्या ५१३६६ आहे. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक ८, ११, २२, २५, ३२, ३५, ४५ मध्ये लोकसंख्या ५० हजारांपेक्षा जास्त आहे.
- १४ प्रभागातील लोकसंख्या ४५ हजारांपेक्षा कमी आहे. सर्वात कमी लोकसंख्येचा प्रभाग १४ आहे. येथील लोकसंख्या ४१९६२ आहे. त्याचबरोबर प्रभाग ३, ९, १३, १५, १६, १८, २८, ३८, ३९, ४०, ४४, ४६, ४७ क्रमांकाच्या प्रभागाची लोकसंख्या ४५ हजारांपेक्षा कमी आहे.
लोकसंख्येनुसार असे असू शकते आरक्षण
- नागपूर महापालिकेत ३१ जागा अनुसूचित जाती, १२ जागा अनुसूचित जमातीच्या उमेदवारासाठी आरक्षित राहणार आहेत. प्रशासनाच्या नुसार ज्या प्रभागात अनुसूचित जाती, जमातीची लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्या प्रभागात कमी होत असलेल्या लोकसंख्येच्या क्रमानुसार आरक्षित करण्यात येईल. मनपाने निवडणूक आयोगाकडून आरक्षित जागेसंदर्भात आलेली माहिती अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. लोकसंख्येच्या आधारेच जागांचे आरक्षण करण्यात येईल. त्यासाठी सोडत काढण्यात येईल.
- प्रभाग १, २, ४, ५, ७, ९, १०, १२, १३, १४, १५, १६, १८, १९, २०, २१, २७, २८, ३०, ३३, ३४, ३६, ३७, ३८, ३९, ४३, ४४, ४५, ४६, ५१, ५२ मध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या अधिक आहे. त्यामुळे या प्रभागातील तीनपैकी एक जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित होण्याची शक्यता आहे.
- प्रभाग क्रमांक ४, ८, १०, ११, १२, १३, १६, २०, २४, २५, ३७ व ५१ मध्ये तीनपैकी एक जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव होऊ शकते. - प्रभाग ४, १०, १२, १३, १६,२०, ३७, ५१ या एकूण ८ प्रभागांमध्ये अनु. जाती व अनु. जमातीचे उमेदवार लढतील.
- एकूण १७ प्रभाग असे आहेत की जेथे कुठलेही सामाजिक आरक्षण नसेल. प्रभाग क्रमांक ३, ६, १७, २२, २३, २६, २९, ३१, ३२, ३५, ४०, ४१, ४२, ४७, ४८, ४९, ५० यांचा यात समावेश आहे.
प्रभाग कटिंगवर नाराजी, आक्षेपांचा पाऊस पडणार
- नव्या प्रभाग रचनेत काही नगरसेवकांचे गड उद्ध्वस्त झाले आहेत. प्राबल्य असलेली वस्ती कुठे दोन भागांत तर कुठे तीन भागांत विभागली गेली आहे. प्रभाग रचनेसाठी भौगोलिक परिस्थती, रिंग रोड, आयआरडीपी रोडचा आधार घेतल्यामुळे काही वस्त्या दुसऱ्या टोकावर व लांब असलेल्या वस्तीशी जोडल्या गेल्या आहेत. १४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ पर्यंत यावर आक्षेप घेण्याची मुदत आहे. राजकीय कार्यकर्ते प्रभाग रचनेच्या अभ्यासाला लागले आहेत. मंगळवारी रंगलेल्या चर्चा पाहता आक्षेपांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.