लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पौर्णिमा दिनानिमित्त नागरिकांना ऊर्जा बचतीचा संदेश देणाऱ्या नागपूर महापालिकेला ‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’कडून ‘ऊर्जा बचत’ गटातील यंदाचा ‘स्टार म्युनिसिपल लिडरशीप’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
मनपाने पौर्णिमादिनी ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या सहकार्याने सुरू केलेल्या उपक्रमाची ‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’ने दखल घेतल्याने मनपाचा देशात नावलौकिक झाला आहे. या यशाबद्दल महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्य करणारे स्वयंसेवक व मनपा कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
मनपा आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या वतीने २०१४ पासून ऊर्जा बचतीच्या दृष्टीने पौर्णिमा दिवस हा विधायक उपक्रम तत्कालीन महापौर व आमदार प्रा. अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात हाती घेण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत प्रत्येक पौर्णिमेच्या प्रकाशात रात्री अनावश्यक वीजदिवे बंद करण्याचे. पौर्णिमेच्या रात्री दिवे बंद ठेवले जात असल्याने आतापर्यंत २ लाख ५३ हजार २०१ किलो कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण आणण्यात आले आहे.
अर्थ डे नेटवर्क इंडियाद्वारे देशातील महापालिकांसाठी १० वेगवेगळ्या श्रेणीतील ‘स्टार म्युनिसिपल लीडरशीप’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. विशेष म्हणजे, या पुरस्कारासाठी मनपाला स्वत: अर्ज न करता त्यासाठी शहरातील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था किंवा शैक्षणिक संस्थांद्वारे नामांकन सादर करणे अनिवार्य होते. त्याअंतर्गत तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनात ग्रीन व्हिजील फाऊडेशनचे संचालक कौस्तुभ चॅटजी व सुरभी जायस्वाल यांनी ऊर्जा बचत आणि हरित आच्छादनाचा वाढता वापर या दोन श्रेणींमध्ये नागपूर महापालिकेचा नामांकन प्रस्ताव दाखल केला होता.