नागपूर : महापालिकेच्या बहुचर्चित स्टेशनरी घोटाळ्यात आर्थिक शाखेने औषधी भांडाराच्या प्रमुखास अटक केली आहे. प्रशांत भातकुलकर (५६, रा.चिटणीसपुसा) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील ही आठवी अटक आहे.
स्टेशनरी घोटाळ्यामुळे महापालिकेतील वातावरण तापले होते. स्टेशनरी खरेदी न करताच, ६७ लाखांचे बिल जारी करण्यात आले होते. महापालिका आयुक्तांनी तपासाचे निर्देश दिल्यानंतर प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर, सदर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. सदर पोलिसांनी फसवणूक, तसेच गुन्हेगारी षडयंत्राचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यास सुरुवात केली.
प्रकरण मोठे असल्यामुळे हे प्रकरण आर्थिक शाखेकडे सोपविण्यात आले. आर्थिक शाखेच्या तपासात भातकुलकरच्या सांगण्यावरून स्टेशनरी मिळाल्याच्या स्टॉक रजिस्टरमध्ये नोंद करण्यात आली, परंतु प्रत्यक्षात स्टेशनरी महापालिकेत पोहोचलीच नाही. त्या आधारे आर्थिक शाखेने भातकुलकरला अटक केली.
तपास अधिकारी निरीक्षक पी.वाय. कांबळे यांनी भातकुलकरला न्यायालयासमोर हजर करून ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे. यापूर्वी या प्रकरणात ठेकेदार पद्माकर साकोरे, अतुल साकोरे, मनोहर साकोरे, सामान्य प्रशासन विभागातील लिपिक मोहन पडवंशी, तसेच ऑडिटर मो.अफाक अहमदला अटक करण्यात आली आहे.