लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दीर्घ प्रतीक्षेनंतर स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके यांनी २,७३१ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. आठवड्यानंतरही अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान उपस्थित मुद्दे अर्थसंकल्पात समाविष्ट करण्याचे काम सुरू आहे. सभागृहाने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. परंतु आयुक्तांच्या मंजुरीनंतरच अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. सध्याची परिस्थिती विचारात घेता दिवाळीनंतरच अर्थसंकल्प अमलात येण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सूचना व बदल समाविष्ट केल्यानंतर अर्थसंकल्प मंजुरीसाठी आयुक्तांकडे पाठविला जाईल. यासाठी दोन-तीन दिवस लागतील. त्यानंतर आयुक्त अवलोकन करून त्यावर स्वाक्षरी करतील. यासाठी काही दिवस लागतील. १४ नोव्हेंबरला दिवाळी आहे. दरम्यान, कंत्राटदारांनी थकीत २०० कोटीची मागणी केली आहे. कर्मचाऱ्यांना दिवाळी अॅडव्हान्स द्यावा लागेल. त्यातच वेतन आयोग लागू करण्यासाठी आंदोलन सुरू आहे. अशा परिस्थितीत या महिन्यात मनपा प्रशासनाला खर्चासाठी २०० कोटीहून अधिक रकमेची गरज भासणार आहे. याचा विचार करता मनपावर अतिरिक्त बोजा पडणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्प दिवाळीनंतरच अमलात येण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर आठवडाभराची सुटी राहील. याचा विचार करता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अंमलबजावणी सुरू होईल.
दिवाळीपूर्वी अंमलबजावणी होईल - झलके
अर्थसंकल्प दिवाळीपूर्वी अमलात येईल, असा विश्वास स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके यांनी व्यक्त केला. सभागृहात सदस्यांची ज्या सूचना दिल्या, मागणी केली त्याचा समावेश करणे आवश्यक आहे. दोन-तीन दिवसात पूर्ण अर्थसंकल्प मंजुरीसाठी आयुक्तांकडे पाठविला जाईल. वास्तविक सभागृहाची मंजुरीच अंतिम असते. दिवाळीपूर्वीअर्थसंकल्पानुसार कामे मंजुरीला सुरुवात होणार असल्याचे झलके म्हणाले.