नागपूर : नागपूर शहरात गोळा होणाऱ्या कचऱ्यापासून सीएनजी(CNG) व ग्रीन हायड्रोजन(Green Hydrogen) बनविण्याचा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे. कचऱ्यापासून सीएनजी बनविण्यासाठी एका डच कंपनीने तसेच ग्रीन हायड्रोजनसाठी चेन्नई मनपामध्ये कार्यरत असलेल्या कंपनीने इच्छा दर्शविली आहे. संबंधित उपक्रमाचा प्रस्ताव लवकरच सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी मांडल्या जाईल, अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
संबंधित डच कंपनी २५ हेक्टर जमीन खरेदी करून कचऱ्यापासून सीएनजी बनविण्याचा प्रकल्प स्थापन करण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भातील प्रस्ताव त्यांनी सादर केला आहे. शहरात दररोज बाराशे मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. त्यातील हजार मेट्रिक टन कचरा कंपनीला देण्यात येईल. शिवाय सीएनजीतून मिळणाऱ्या लाभातून काही महसूल कंपनी मनपाला देईल. दुसरीकडे चेन्नईतील कंपनीला दोन एकर जमीन मनपा उपलब्ध करून देईल. त्यांना ५० मेट्रिक टन कचरा द्यावा लागेल. त्यातून ते ग्रीन हायड्रोजन निर्माण करतील.
कंपनीजवळ ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याचे उपकरणदेखील आहे. दोन्ही कंपन्यांच्या प्रस्तावांना नीरीकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आले आहे. नीरीने हा प्रकल्प चांगला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच मनपा संबंधित प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे. जर दोन्ही कंपन्यांनी कचऱ्यावर प्रक्रिया करून सीएनजी व ग्रीन हायड्रोजन तयार करण्याची सुरुवात केली तर कचऱ्याच्या प्रक्रियेची समस्या दूर होईल. शिवाय स्वच्छता रँकिंगमध्ये नागपूरला याचा फायदा होईल, असा दावा महापौरांनी केला.
वायू-ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी नीरीची मदत
शहरातील स्मशानघाटांना पर्यावरणपूरक बनविण्यासाठीदेखील नीरीचे सहकार्य घेतले जात आहे. शिवाय वायू तसेच ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी रस्ता दुभाजकांवर काही विशिष्ट जातीची झाडे लावण्याची प्रक्रिया नीरीच्या मदतीने सुरू करण्यात आली आहे. नीरीचे वैज्ञानिक लाल सिंह यात सहकार्य करत आहेत, अशी माहिती महापौरांनी दिली.
समाधानी आहे, पण संतुष्ट नाही
महापौरपदाची जबाबदारी स्वीकारून महापौरांना एक वर्ष झाले आहे. या वर्षातील साडे पाच महिने कोरोना व दीड महिना विधान परिषदेच्या आचारसंहितेत गेला. यादरम्यान सार्वजनिक सुट्यादेखील होत्या. जो वेळ मिळाला त्यात जे काम केले त्याने संतुष्ट नाही, पण समाधानी आहे, असे महापौरांनी सांगितले.