नागपूर : आम्ही शहरात नाही, तर खेड्यात राहतोय, अशा संतप्त प्रतिक्रिया पूर्व नागपुरातील दुर्गानगर, बन्सीनगर, मारोती सोसायटी, अम्बेनगर, जयभोलेनगर, राणीसतीनगरातील रहिवासी व्यक्त करतात. या वस्त्यांमध्ये घराघरापुढे पसरलेल्या घाणीमुळे येथील नागरिकांच्या आरोग्याची धुळधाण झाली आहे. वीस-वीस वर्षांपासून वसलेल्या या वस्त्यांकडे लक्ष द्यायला कुणी तयार नाही. एकीकडे शहराचा अनावश्यक विकास होत असताना, आउटरच्या वस्त्या अशा भीषण अवस्थेत जगत आहे.
- गडर लाइनच नाही
या वस्त्यांमध्ये गडर लाइन नाही. लोकांनी सेफ्टी टॅंक तयार केले होते, पण तेही आता चोक झाले आहेत. त्यामुळे घरातील सर्वच घाण घराच्या बाजूला, शेजारी असलेल्या मोकळ्या प्लॉटमध्ये सोडली जात आहे. वर्षभर घाणीचे साम्राज्य असल्यामुळे येथील लोक त्रस्त झाली आहे. या घाणीतील विषाणू कोरोनापेक्षाही जास्त धोकादायक आहे. जलवाहिनी नसल्याने बोअरवेलवर पाण्याचा पुरवठा आहे. त्यामुळे हे घाण पाणी बोअरवेलला लागले आहे. दुर्गंधी, डासांचा विळखा, विषारी जीवजंतूनी हा परिसर व्यापला आहे. चार लोकप्रतिनिधी असतानाही या व्यथा त्यांना दिसत नाही, अशी खंत स्थानिक रहिवासी गोपीचंद सोनटक्के यांनी व्यक्त केली.
- ओबडधोबड रस्ते, खड्डे आणि खाचखळगे
दुर्गानगर अंबेनगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सद्या दुचाकीवर जाताना जरा सांभाळूनच जावे लागते. या रस्त्याचे केवळ खडीकरण करण्यात आले आहे. खडीकरण केलेल्या रस्त्यावर अवजड वाहनांमुळे खड्डे पडलेले आहे. रस्ते ओबडधोबड झाले आहे. खड्ड्यांमध्ये घाण पाणी भरले आहे. हे घाण पाणी जनावरेही पितांना दिसत आहेत. शहराच्या गल्लीबोळात रस्ते बनले, पण या रस्त्याचा मुहूर्त कधी निघेल, असा सवाल स्थानिक रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सोनटक्के यांनी केला.
- उघड्या डीपी, हायटेंशनलाइन खाली रस्ता
हायटेंशन लाइन पूर्व नागपुरातील मोठे दुखणे आहे. या हायटेंशन लाइनच्या दोन्ही बाजूला घरे बनलेली आहे आणि खालून रस्ता आहे. रस्त्याच्या मधात हायटेंशन लाइनचे खांब आहेत. त्यामुळे ही हायटेंशन लाइन कधी कुणाचा घात करेल, अशी भीती भारत येनुरकर यांनी व्यक्त केली. याच भागात रस्त्याला लागून असलेली उघडी डीपी धोक्याची ठरत आहे.
- रस्त्यावर अतिक्रमण, अनावश्यक लावले कठडे
सुंदरनगर नावाच्या वस्तीत १८ फुटांचा रस्ता अतिक्रमणामुळे १५ फुटांचा झाला आहे. अशात अनावश्यक तिथे आणि रस्त्यावरच वृक्षारोपण करून कठडे लावले आहे. महापालिकेकडून लावण्यात आलेली बाके रस्त्यावरच लावली आहेत. एक प्रकारे हा शासकीय मालमत्तेचा दुरुपयोग असल्याची ओरड स्थानिक रहिवासी रमेश डोकरीमारे यांनी केली.