मनपा म्हणते रोडवरचे केवळ एकच अनधिकृत धार्मिकस्थळ वाचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:53 PM2018-09-26T23:53:01+5:302018-09-26T23:53:43+5:30
महानगरपालिकेने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून सार्वजनिक रोडवरचे केवळ एकच अनधिकृत धार्मिकस्थळ वाचले असल्याची माहिती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानगरपालिकेने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून सार्वजनिक रोडवरचे केवळ एकच अनधिकृत धार्मिकस्थळ वाचले असल्याची माहिती दिली.
नवी शुक्रवारीतील काका हार्डवेअरजवळ शिव मंदिर आहे. ते मंदिर सार्वजनिक रोडवर आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या कारणामुळे ते मंदिर तोडण्यात आले नाही असे मनपाचे म्हणणे आहे. २९ आॅगस्ट २०१८ रोजी सादर प्रतिज्ञापत्रामध्ये मनपाने रोड व फूटपाथवरची १२ अनधिकृत धार्मिकस्थळे वाचली असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यापैकी ११ अनधिकृत धार्मिकस्थळे हटविण्यात आली.
नागपूर सुधार प्रन्यासच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या क्षेत्रामध्ये एकूण ५४६ अनधिकृत धार्मिकस्थळे होती. रोड व फूटपाथवर असलेल्या ८७ पैकी ८१ अनधिकृत धार्मिकस्थळे हटविण्यात आली आहेत. उर्वरित ६ पैकी ४ धार्मिकस्थळे १९६० पूर्वी बांधण्यात आली असून त्यावर निर्णय घेण्यासाठी राज्यस्तरीय समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. दोन धार्मिकस्थळे खासगी जमिनीवर आहेत.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सार्वजनिक रोड व फूटपाथवर बांधण्यात आलेल्या कोणत्याही अनधिकृत धार्मिकस्थळाला संरक्षण नाही. तसेच, २९ सप्टेंबर २००९ नंतरची सार्वजनिक भूखंडांवरील अनधिकृत धार्मिकस्थळेही पाडणे आवश्यक आहे. यासंदर्भात मनोहर खोरगडे व डॉ. गजानन झाडे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर येत्या शुक्रवारी पुढील सुनावणी होईल. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.