नागपूर : मनपा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी मंगळवारचा दिवस विशेष असाच आहे. कारण मंगळवारी निवडणूक आयोगातर्फे प्रभागाच्या सीमांचे प्रारूप प्रकाशित करण्यात येणार आहे. यासोबतच प्रभागांच्या सीमा कशा राहतील, हे स्पष्ट होईल आणि इच्छुक उमेदवार आपापल्या पद्धतीने कामाला लागतील. www.nmcnagpur.gov.in या वेबसाईटवर नकाशा उपलब्ध होईल.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नागपूर मनपाचा प्रभाग आराखडा मनपाच्या अधिकृत वेबसाईटवर मंगळवारी अपलोड केला जाईल. तसेच प्रभागाचा नकाशा ऑफलाइन पाहण्यासाठी सिव्हिल लाईन्स येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या हिरवळीवर आणि शहरातील दहाही झोन कार्यालयांत व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता सर्व ठिकाणी नकाशे उपलब्ध होतील, अशी माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
तीनसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणाऱ्या निवडणुका पाहता, ५२ प्रभाग बनविण्यात आले आहेत. प्रभागांना नावाऐवजी क्रमांक दिले जाणार असल्याची माहिती आहे. १ ते १४ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत मनपाच्या निवडणूक कार्यालयात किंवा संबंधित झोन कार्यालयात आपत्ती व सूचना नोंदवता येतील. आपत्ती व सूचना नोंदविणाऱ्यांना सुनावणीदरम्यान उपस्थित राहण्यासाठी मनपाने सूचित केले आहे.
१६ फेब्रुवारी रोजी प्राप्त सूचना व हरकती राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केल्या जातील. २६ फेब्रुवारीपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडून प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत त्यावर सुनावणी होईल. २ मार्च रोजी सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकारी शिफारशींना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करतील.
मनपा प्रभाग रचनेचा आराखडा आज, मंगळवारी जारी होणार असला तरी, सोमवारी मनपा मुख्यालयात अनेक नगरसेवक व इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. काहींनी तर त्यांच्या मोबाईलवर त्यांच्या प्रभागाचा नकाशा असलेले फोटो दाखवून त्यांना त्यांचे नंबर सुद्धा माहिती असल्याचा दावा केला. सत्तापक्ष व विरोधी पक्ष यातील काही वरिष्ठ नगरसेवकांना त्यांच्या प्रभाग रचनेची माहिती आधीपासूनच असल्याचा दावाही काहींनी केला. वरिष्ठ नगरसेवकांनी मात्र यात काही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. एकूणच, सोमवारी मनपा मुख्यालयात निवडणुकीचे वातावरण तापलेले होते.
ओबीसी आरक्षणामुळे ‘ड्रॉ’वर निर्णय नाही
निवडणूक आयोगाने प्रभाग प्रारूप आराखड्याचा कार्यक्रम जारी केला आहे. परंतु आरक्षण सोडतीबाबत कुठलेही आदेश जारी झालेले नाहीत. सूत्रानुसार ओबीसी आरक्षणावर निर्णय झाला नसल्याने आरक्षणाची सोडत पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोना संक्रमण व ओबीसी आरक्षणावर निर्णय न झाल्याने निवडणूक कार्यक्रमास उशीर होणार असल्याचेही म्हटले जात आहे. जाणकारांचे म्हणणे आहे की, आराखडा अंतिम झाल्यानंतर एक - दोन दिवसात ड्रॉ’ काढला जाऊ शकतो.
दृष्टिक्षेप...
- मनपा क्षेत्रातील एकूण लोकसंख्या २४,४७,४९४
-अनुसूचित जातींची लोकसंख्या : ४,८०,७५९
-- अनुसूचित जमातीची लोकसंख्या : १,८८,४४४
- ३ सदस्यीय प्रभागांची एकूण संख्या : ५२
- सभागृहातील सदस्यांची संख्या : १५६
- प्रभागाची सरासरी लोकसंख्या ४७,०६७
प्रभागाची जास्तीत जास्त लोकसंख्या : ५१,७७४
प्रभागाची कमित कमी लोकसंख्या : ४२,३६०