नागपूर : वृद्ध दाम्पत्याकडून विमान प्रवासाचे भाडे घेऊन सायबर गुन्हेगाराने संबंधित व्यक्तीला तिकीट मात्र दिलेच नाही. दीड वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणात सोनेगाव पोलीस ठाण्यात बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
अनिलकुमार रतनलाल तेजपाल (वय ६६) असे तक्रार करणाऱ्यांचे नाव आहे. तेजपाल दाम्पत्य सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वागत सोसायटीत राहते. हे दाम्पत्य १० नोव्हेंबर २०१९ला गोव्यात होते. त्यांना नागपूरला परत यायचे होते. विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांना आपले तिकीट कॅन्सल झाल्याचे कळले. त्यामुळे त्यांच्या मोबाईलवर आलेल्या आयपी ॲड्रेसवर संपर्क करून त्यांनी गोवा ते नागपूर अशी विमानाची दोन तिकिटे बुक केली. प्रत्येकी २३ हजार याप्रमाणे ४६ हजार रुपये त्यांनी ऑनलाईन पेमेंट केले. मात्र, त्यांना हे तिकीट काही मिळाले नाही. दरम्यान, तेजपाल यांनी सायबर शाखेत तक्रार नोंदवली. अखेर चौकशीअंती बुधवारी या प्रकरणात सोनेगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.