नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) निवासी डॉक्टर सलग तिसऱ्या दिवशी सामूहिक रजेवर (संप) असल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी गुरुवारी रात्री डॉक्टरांशी चर्चा केली. त्यांनी अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांना सर्जिकल कॉम्प्लेक्समधील कोरोना रुग्णांना इतरत्र स्थानांतरित करून त्या ठिकाणी ‘नॉन कोविड’ रुग्णांना भरती करण्याचा सूचना केल्या. परंतु आश्वासन नको, प्रत्यक्ष कृती हवी, यावर डॉक्टर अडून बसल्याने शुक्रवारी संप कायम असणार आहे.
मेयोच्या सर्जिकल कॉम्प्लेक्समधील कोरोना रुग्णांना इतरत्र स्थानांतरित करून तिथे ‘नॉन कोविड’ रुग्णांची भरती करण्याच्या मागणीसाठी निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने मंगळवारपासून संपाचे हत्यार उपसले. आंदोलनात २३० निवासी डॉक्टर सहभागी झाल्याने ओपीडी, आयपीडी, वॉर्डातील रुग्णसेवा व आता शस्त्रक्रियाही प्रभावित झाल्या आहेत. सूत्रानुसार, नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दोन दिवस होऊनही मागण्यांना गंभीरपणे घेतले जात नसल्याचे पाहून ‘मार्ड’ने आयसीयूमध्ये दिली जात असलेली निवासी डॉक्टरांची सेवा बंद करण्याची गुरुवारी पावले उचलली होती. परंतु वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. लहाने यांनी रात्री चर्चेला बोलावल्याने हा निर्णय थांबवून ठेवण्यात आला.
सूत्रानुसार, डॉ. लहाने यांनी केलेल्या चर्चेत कोरोना रुग्णांना रुग्णालयाच्या दुसऱ्या इमारतीत स्थानांतरित करण्यास अधिष्ठातांना सूचना दिल्या. परंतु महिन्याभरापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी असेच आश्वासन दिल्यानंतरही उपाययोजना झाल्या नाहीत. यामुळे आधी रुग्णांचे स्थानांतरण, नंतरच आम्ही सामूहिक रजा आंदोलन मागे घेऊ, अशी भूमिका ‘मार्ड’ने घेतली आहे.