लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लावण्यात आलेल्या लॉकडाऊनला किन्नर विकास महामंडळातर्फे विरोध करण्यात आला आहे. जर पालकमंत्र्यांनी परत लॉकडाऊन लावला तर किन्नरांतर्फे बंदी झुगारण्यात येईल, असा इशारा महामंडळाच्या सदस्य राणी ढवळे यांनी दिला आहे.
लॉकडाऊनमुळे किन्नर समाजावर आर्थिक संकट कोसळले आहे. अनेकांचे तर घरभाडे थकलेले आहे. अशास्थितीत आता जायचे कुठे, असा प्रश्न पडला आहे. उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनावर नियंत्रण आलेले नाही. हे माहीत असतानादेखील लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला तर आमचा त्याला विरोध असेल.
लाॅकडाऊनमुळे गरिबांसमोरील समस्या वाढल्या आहेत. ऑनलाईन मद्यविक्री सुरू असून, चहाठेले व पानटपऱ्या बंद केल्या. दुचाकी आणि चारचाकी चालकांवर कारवाई होते. मग एसटी का बरे सुरू ठेवली. एसटीतून कोरोनाची लागण होत नाही काय, असा सवाल ढवळे यांनी केला. लाॅकडाऊन लावूनही कोरोनाच्या रूग्णात वाढ होत आहे. त्यामुळे लाॅकडाऊन लावताना आमचादेखील विचार करावा, अशी मागणी ढवळे यांनी केली.