लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ३७ हजारांच्या जवळ पोहोचली आहे. साडेआठ हजारांच्या जवळपास रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. सध्या परिस्थिती इतकी भयावह झाली आहे की, कितीही शोधले तरी कोविड रुग्णांसाठी बेड (खाटा) उपलब्ध नाहीत. याउपरही मनपाने रुग्णालयात उपलब्ध असलेल्या खाटांची जी यादी जाहीर केली आहे, त्यानुसार खासगी व शासकीय रुग्णालयांत एकूण ४९४ बेड (खाटा) खाली आहेत. यामध्ये ऑक्सिजनवाले २९९, आयसीयूत १०० आणि व्हेंंटिलेटरच्या ९५ खाटांचा समावेश आहे.
शहरातील ७९ रुग्णालयांत ऑक्सिजनचे केवळ ११९, आयसीयूचे २६ आणि व्हेंंटिलेटरचे ११ बेड उपलब्ध आहेत. यावरूनच परिस्थिती किती भयावह आहे, याची कल्पना करता येऊ शकते. गरजू व्यक्तीने नियंत्रण कक्षात फोन लावला तर तो उचललाच जात नाही. जवळच्या रुग्णालयात बेडच उपलब्ध नाहीत. झोन स्तरावरचा विचार केला तर लक्ष्मीनगर झोनमध्ये ९ मोठी रुग्णालये आहेत, जिथे कोविड रुग्णांवर उपचार होत आहेत. परंतु येथील केवळ एकाच रुग्णालयात एक ऑक्सिजनचा बेड खाली आहे. गांधीबाग, सतरंजीपुरा झोनमध्ये क्रमश: एक आणि दोन रुग्णालये आहेत. परंतु येथे एकही बेड खाली नाही. लकडगंज झोनमध्ये दोन रुग्णालयांत १६ ऑक्सिजनचे बेड खाली आहेत. जितकीही मोठी रुग्णालये आहेत तिथे बेड उपलब्ध नाहीत. धरमपेठ झोनमध्ये सर्वाधिक २१ रुग्णालये आहेत. परंतु, येथे ऑक्सिजनचे १८, आयसीयूचे १६ व व्हेंंटिलेटरचे ५ बेड खाली आहेत. यावरून परिस्थिती किती भयावह आहे, याची कल्पना येते. मेयो, मेडिकल, एम्समध्ये बेड खाली दाखविले जात आहेत. परंतु येथे रुग्णांना भरती केले जात नाही. विशेष म्हणजे नागपूर शहर व ग्रामीणमध्ये खासगी व शासकीय रुग्णालयांत ८ ते ९ हजार बेड उपलब्ध आहेत. दररोज ३,५०० पेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. यापैकी १५ टक्के रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत आहेत. ५ टक्के लोकांनाही भरती करण्याची गरज पडली तर ३५० खाटांची आवश्यकता पडेल. स्थिती अतिशय नाजूक आहे; परंतु प्रशासन स्तरावर अद्याप कुठलेही प्रभावी पाऊल उचलले जात असल्याचे दिसत नाही.