नागपूर : एका घरात घरफोडी केल्यानंतर मनाप्रमाणे दागिने किंवा रोख न सापडल्याने चोरट्यांनी जाताना घरातील मुलाची गिअरची सायकल व खेळण्यांवरच हात मारला. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घरफोडी झाली.
शिल्पा कोमलचंद भट (४२, चंद्रमणी नगर) या १ ऑगस्ट रोजी त्यांच्या घराला कुलूप लावून बेलतरोडी येथे राहणाऱ्या त्यांच्या भावाकडे कुटुंबियांसह गेल्या होत्या. त्यांना दोन मुले व एक लहान मुलगी आहे. २ ऑगस्ट रोजी मुलाला ट्यूशनला सोडण्यासाठी त्या घरी आल्या असता मुलाची गिअरची सायकल अंगणात नव्हती. मुख्य दरवाजाची कडी तुटलेली होती. त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता घरातील कपाट उघडलेले होते व सामान अस्ताव्यस्त पडले होते.
चोरट्यांनी घरातून सोन्याची दीड तोळ्याची चेन, कानातील एक तोळ्याचे टॉप्स, साडेतीन हजार रुपये रोख लंपास केले. सोबतच जाताना चोरटे एक बॅग, सायकल व मुलांचे खेळणेदेखील चोरून घेऊन गेले. भट यांच्या तक्रारीवरून अजनी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.