निशांत वानखेडे, नागपूर : भविष्यातील खाद्य सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी देशातील मत्स्य व्यवसाय अधिक बळकट करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मत्स्य उत्पादन दुपटीने वाढवून देशात ‘निळी क्रांती’ साधण्याचे उद्दिष्ट्य केंद्र सरकारने निर्धारीत केले आहे व त्यासाठी मासेमारांना गुणवत्तापूर्ण मत्स्यबीज मिळणे आवश्यक आहे. मात्र नागपूर विभागात निळी क्रांतीच्या उद्देशाचा फज्जा उडताना दिसताे. कारण काेट्यवधी खर्च करून तयार करण्यात आलेले विभागातील १० मत्स्यबीज केंद्रापैकी एकाही केंद्राला सरकारकडून गुणवत्तेचे प्रमाणीकरण मिळू शकले नाही.
जगातील इतर देशांच्या तुलनेत मत्स्य उत्पादनात भारत मागे आहे. खाद्य सुरक्षेच्या दृष्टिने मत्स्य व्यवसायाला महत्त्व आले आहे. त्यामुळे उत्पादन वाढवून निळी क्रांतीला बळ देण्याचा सरकारचा उद्देश आहे. त्यासाठी मासेमारांना उत्तम प्रतिचे बीज मिळावे म्हणून सरकारने मत्स्यबीज केंद्रांना दिशानिर्देश दिले आहेत. त्यांचे पालन करून बीज तयार करणाऱ्या केंद्राचे राज्य सरकारद्वारे प्रमाणीकरण करणे आणि त्याच केंद्रातून मासेमारांना बीज पुरवठा करणे आवश्यक आहे. मात्र मासेमारांना उत्तम प्रतिचा बीज पुरवठा करण्यात सरकारी मत्स्यबीज केंद्रच अपयशी ठरले आहेत. राज्य सरकारने नुकतेच राज्यातील मत्स्यबीज केंद्राना प्रमाणीकरण प्रमाणपत्र दिले, मात्र त्यात नागपूर विभागातील एकाही मत्स्यबीज केंद्राचा समावेश नव्हता.
नागपूर विभागात शासनाचे १० मत्सबीज केंद्र आहेत, जे काेट्यवधी खर्च करून सरकारने तयार केले आहेत. यामध्ये मत्स्यबीज केंद्र पेंच, वेणा, खिंडसी, भंडारा जिल्ह्यातील शिवनी बांध, गाेंदिया जिल्ह्यात गाेठणगाव इटियाडाेह, नागठाना येथील केंद्र व आंभाेरा येथील केंद्राचा समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात चारगाव व अमरनाला तसेच पाथरी येथील आसाेलामेंढा मत्स्यबीज केंद्राचा समावेश आहे. हे केंद्र सरकारने स्व:खर्चाने तयार केलेले आहेत. प्रमाणीकरण न हाेणे म्हणजे चांगल्या प्रतिचे मत्स्यबीज न मिळणे हाेय. अशावेळी मासेमारांनी उत्पादन वाढवायचे कसे, हा प्रश्न आहे.
एकमेव खाजगी केंद्राचे प्रमाणीकरण
राज्य सरकारने नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील विरखंडीच्या परम मत्स्यबीज केंद्र या खाजगी केंद्राला नुकतेच प्रमाणीकरण प्रमाणपत्र दिले आहे. सह्याद्री अतिथीगृहातवर राज्याचे वने व मत्स्यपालन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विदर्भ मासेमार संघटनेचे प्रभाकर मांढरे यांना प्रमाणपत्र दिले.