नरेश डोंगरे
नागपूर : जरीपटक्यातील तिहेरी हत्याकांड आणि आत्महत्या प्रकरणाला २० दिवस होऊनही या थरारक प्रकरणातील रहस्याचा उलगडा झालेला नाही. क्रिकेट सट्ट्याचे व्यसन आणि त्यातून डोक्यावर झालेल्या लाखोंच्या कर्जापोटी क्रिकेट बुकींच्या दडपणामुळे आरोपी मदन अग्रवालने हे थरारकांड केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. मात्र, पडद्यामागचे गुन्हेगार अंधारातच असल्याने या प्रकरणात कोणत्याही आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.
मदन अग्रवाल (वय ४०) असे या प्रकरणातील मृत आरोपीचे नाव असून, त्याच्या क्राैर्याला बळी पडलेल्या पत्नीचे नाव किरण (वय ३४), मुलगा वृषभ (वय १०) आणि मुलगी टिया (वय ५) आहे. जरीपटक्यातील दयानंद पार्कच्या बाजूला १७ आणि १८ जानेवारीच्या रात्रीदरम्यान ही घटना घडली होती. ती १८ जानेवारीच्या सायंकाळी उघड झाली आणि जरीपटकाच नव्हे तर शहरभर खळबळ उडाली होती. आरोपी मदनने मुले आणि पत्नीची हत्या केल्यानंतर स्वत: आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढून तसा गुन्हा दाखल केल्यानंतर जरीपटक्याचे ठाणेदार वैभव जाधव आणि द्वितीय निरीक्षक तृप्ती जाधव यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
मदनला सट्टा, क्रिकेट बेटिंगचे व्यसन होते. त्यात तो घरातील दागिने, रोख सर्व हरल्यानंतर घरावर कर्ज काढलेली रक्कमही हरला. तरीसुद्धा त्याच्यावर ३० ते ४० लाखांचे कर्ज होते आणि ते वसूल करण्यासाठी आपल्या गुंडामार्फत बुकी मदनला धमक्या देत होते. त्यामुळेच त्याने तिघांची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. अवैध सावकारी करणारे आणि बेटिंग करून अनेकांना उद्ध्वस्त करणाऱ्या अनेक बुकींची नावे चर्चेला आल्यानंतर पोलिसांनी डॅडी, कालू, बंटी, शैलू, टायसन, गंगू, पंकज कडी, पाकिस्तानी काकांसह अनेकांवर नजर रोखली.
पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांनीही अनेक बुकींना बोलवून त्यांची स्वत: चाैकशी केली. मात्र, बुकींनी पोलिसांपुढे बयाण देताना ‘तो मी नव्हेच’ची भूमिका वठविली. पोलीस चाैकशी करणार याचा अंदाज आल्याने काही बुकींनी दिशाभूल करणाऱ्या अनेक बातम्या पेरल्या. त्यामुळे मदनला तीन हत्या करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारे पडद्यामागचे गुन्हेगार अद्याप बाहेर आले नाही.
नंबर कुणाचा, कॉल कुणाचे
अवैध सावकारी करणारे आणि क्रिकेट सट्ट्यात गुंतलेले बुकी स्वत:च्या नावाने असलेल्या मोबाईल किंवा सीमकार्डचा गोरखधंद्यासाठी वापर करत नाही. दुसऱ्या कुणाच्या नावाने खरेदी केलेला मोबाईल आणि तिसऱ्याच व्यक्तीच्या नावे असलेल्या सीमकार्डच्या माध्यमातून ते लगवाडी, खयवाडी आणि वसुलीचे काम करतात. मृत मदन आणि किरणच्या मोबाईलवर अनेकांचे कॉल्स आहेत. मात्र, त्यातून कोणत्या बुकीचे या थरारकांडाशी थेट कनेक्शन आहे. ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. या संबंधाने पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांच्याशी संपर्क साधला असता प्रकरणाची कसून चाैकशी सुरू असून, लवकरच रहस्य उलगडले जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली.