लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील मराठा समाजातील नेत्यांना वर्चस्व हवे आहे. त्यामुळे त्यांच्यातील युती ही दोन पक्षांची नसून दोन जातींची असेल. मोगलाई मराठ्यांची ती युती असून त्याला केवळ पक्षाचे लेबल असेल, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी येथे गुरुवारी केली.एका कार्यक्रमासाठी ते नागपुरात आले असता रविभवन येथे पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेस पक्षाला १२ जागांची मागणी करण्यात आली आहे. मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणतेही उत्तर आले नाही. मुळात काँग्रेसच इतर पक्षांना सोबत घेण्याच्या तयारीत नाही. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नवीन पर्याय उभा केला आहे. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव मान्य केला नाही तर लोकसभेच्या सर्व जागा लढवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आपली माणसे बसविण्यासाठी सीबीआयमध्ये फेरबदलमोदी सरकारला सत्तेतून घालविण्यासाठी राफेल मुख्य कारण ठरणार आहे. राफेल हा बोफोर्सपेक्षा मोठा घोटाळा असून हा गुन्हेगारी आणि फसवेगिरी स्वरूपाचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने राफेलच्या खरेदीप्रक्रिया संदर्भात तांत्रिक बाबींची माहिती मागितली आहे. सीबीआय महासंचालकांना त्याबाबत नोटीस बजावली होती. त्यामुळे खरेदी प्रक्रियातील बाबी समोर आल्या असत्या. त्या रोखण्यासाठीच मोदी सरकारने फेरबदल करून आपली माणसे बसविली, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.