लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नोटाबंदीमुळे १०० जणांचा मृत्यू झाला ही दुर्दैवी बाब आहे. परंतु नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार, नक्षलवादावर अंकुश लागून अनेकांचा जीव वाचला. त्यामुळे देशात नोटाबंदीवरील टीका बंद करून देशातील मोठमोठ्या संस्थांद्वारे नोटाबंदीचे विश्लेषण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अर्थक्रांतीचे प्रणेता, सुप्रसिद्ध वक्ता अनिल बोकील यांनी केले.मैत्री परिवार संस्था आणि नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या वतीने बी.आर.ए.मुंडले सभागृहात ‘वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे भारतीय नागरिकांचा आनंद वाढेल काय?’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेश राठी, मैत्री परिवारचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, सचिव प्रमोद पेंडके, उपाध्यक्ष विजय शहाकार उपस्थित होते. अनिल बोकील म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित केले जावे आणि त्यांना दरमहा १० हजार रुपये मानधन सरकारकडून दिले जावे. ज्येष्ठांसाठी ही योजना देशात राबविल्यास युवकांच्या स्थलांतरापासून ते ज्येष्ठांच्या सुरक्षेपर्यंत अनेक प्रश्न सुटतील. सध्याच्या आठ तासांच्या कामाऐवजी सहा तासांच्या दोन शिफ्ट करण्याची गरज आहे. यामुळे कर्मचाºयांचे वेतन वाढले तरी उत्पादन आणि नफ्यात वाढ होईल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. याशिवाय कामाचे तास कमी झाल्याने कुटुंब आणि वैयक्तिक जीवनाकरिता वेळ देता येईल आणि राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होईल. इतर देशात पैसा हे भांडवल असले तरी भारताची १३५ कोटी लोकसंख्या हे आपले मानवी भांडवल आहे. त्याच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देऊन त्यांची खरेदी क्षमता वाढविण्याची गरज आहे. नोटाबंदीमुळे दोन वर्षांपासून बँका, बिलभरण्यासाठीच्या रांगा कमी झाल्या असून, मोठा वेळ वाचल्याचे त्यांनी सांगून नोटाबंदी ही मोठ्या प्रक्रियेची सुरुवात असल्याचे त्यांनी सांगितले. सुरेश राठी यांनी अध्यक्षीय भाषणात नोटाबंदी आणि जीएसटीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रकाश टाकला. प्रा. संजय भेंडे यांनी प्रास्ताविकातून मैत्री परिवार संस्थेच्या कार्यावर प्रकाश टाकला. संचालन प्रा. माधुरी यावलकर यांनी केले. आभार प्रमोद पेंडके यांनी मानले.
नोटाबंदीवर टीका नको, विश्लेषण गरजेचे : अनिल बोकील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 10:33 PM
नोटाबंदीमुळे १०० जणांचा मृत्यू झाला ही दुर्दैवी बाब आहे. परंतु नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार, नक्षलवादावर अंकुश लागून अनेकांचा जीव वाचला. त्यामुळे देशात नोटाबंदीवरील टीका बंद करून देशातील मोठमोठ्या संस्थांद्वारे नोटाबंदीचे विश्लेषण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अर्थक्रांतीचे प्रणेता, सुप्रसिद्ध वक्ता अनिल बोकील यांनी केले.
ठळक मुद्देमैत्री परिवार संस्थेतर्फे हेमंत व्याख्यानमाला