लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकारने सोमवारी रात्री ८ पासून नव्या नियमांच्या अंमलबजावणीसह लॉकडाऊन आणि संचारबंदी जारी केली. नागपुरातील बहुतेक व्यापाऱ्यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत रात्री ८ नंतर दुकाने बंद केली. ‘लोकमत’ चमूने फेरफटका मारला असता, व्यापारी आणि दुकानदारांची अनेक भागात आवराआवर सुरू असलेली दिसली. असे असले तरी, बहुतेक भागात फेरीवाले आणि नागरिकांची बेपर्वाई जाणवली.
शहरात रात्री ८ पासून लॉकडाऊनचा परिणाम पाहावयास मिळाला. रात्री ८ ते ९.३० च्या दरम्यान शहरातील धंतोली, बर्डी, मोमीनपुरा, टेकडी गणेश मंदिर परिसर, मध्यवर्ती रेल्वे स्थानक, लक्ष्मीनगर, बजाजनगर आदी भागात फेरफटका मारला असता, सर्वच ठिकाणी दुकानदारांची आवराआवर सुरू असलेली दिसली. मुख्य बाजारपेठांमधील बहुतेक दुकाने मात्र रात्री ८ वाजता बंद झाली होती. मात्र स्टेडियम परिसरातील चार दुकाने सुरूच होती. किरकोळ विक्री, फेरीवाले, फळविक्रेते, पानठेले, चहाची दुकाने आदी ठिकाणी ग्राहकांची गर्दी होती. बर्डी मार्केटमधील दुकाने रात्री ८ वाजता बंद झाली होती, तरीही काही फेरीवाले रात्री ८.३० नंतरही रस्त्यावर दुकान मांडून बसलेले दिसले. मुख्य मार्गावर असलेले एक भेल भंडार, फूट वेअर पूर्णत: उघडे होते. बाजूलाच चौकालगत पाणीपुरी, भेळ विक्रेतेही गिऱ्हाईकांच्या गर्दीत दिसले. या परिसरातील सर्वच मॉल बंद होते. पेट्रोल पंप, मेडिकल स्टोअर्स, रुग्णालये आदी अत्यावश्यक सेवा मात्र सुरू होत्या.
रात्री ८ नंतर मंदिरे बंद ठेवण्याचे आदेश असले तरी, तुलसी मानक चौकातील एक मंदिर सुरूच होते. टेकडी गणेश मंदिराचे प्रवेशद्वारही बंद होते. नवीन कार घेऊन पूजेसाठी आलेल्या एका कुटुंबाने मुख्य प्रवेशद्वारातूनच पूजा केली. मंदिर बंद झाल्याने काही भाविकांनी मुख्य प्रवेशद्वारावरच आरती केली.
रेल्वे स्टेशन परिसरात ऑटो रिक्षांच्या रांगा लागलेल्या दिसल्या. या परिसरातील बहुतेक उपाहारगृहे सुरूच होती. तेथून पार्सल सेवा दिली जात होती. संचारबंदी लागू असली तरी, वर्दळ मात्र कायम होती. पोलिसांचा बंदोबस्त कुठेच दिसला नाही. मोमीनपुरा परिसरातील चंद्रलोक बिल्डिंग परिसरातील बहुतेक दुकाने रात्री ९ च्या दरम्यान बंद दिसली. मात्र चौकामध्ये आणि बाजारओळीत चांगलीच गर्दी होती. अनेक दुकाने रात्री ९ वाजताही सुरू दिसली. विशेषत: पानठेल्यांवर सर्रास गर्दी दिसली.
पाणीपुरी, भेळ आदी फेरीवाल्यांनी मात्र संचारबंदीचा नियम कुठेच पाळलेला दिसला नाही. लक्ष्मीनगर, बजाजनगर, धंतोली, बर्डी, मोमीनपुरा आदीसह सर्वच ठिकाणी त्यांच्याकडून नियमांची पायमल्ली झालेली दिसली. ग्राहकही गर्दी करून आस्वाद घेताना दिसत होते. बर्डी परिसरात तर हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्याच्या नाकावर टिच्चून फेरीवाल्यांचा व्यवसाय सुरू होता.
दुकानदारांमध्ये संभ्रम
संचारबंदी आणि लॉकडाऊनसंदर्भात अनेक दुकानदारांमध्ये संभ्रम दिसला. यापुढे कायम ३० तारखेपर्यंत दुकाने बंद ठेवायची, की फक्त शनिवारी व रविवारी बंद ठेवायची, अशी विचारणा करताना अनेकजण दिसले. बंद दुकानांसमोर उभ्या असलेल्या दुकानदारांमध्येही यावरच चर्चा सुरू असलेली दिसली.
पोलिसांचा बंदोबस्त नाही
रात्री ८ वाजता संचारबंदी सुरू झाली असली तरी, कोणत्याही चौकात पोलिसांचा बंदोबस्त दिसला नाही. सर्रास वाहतूक सुरू होती. अनेक ठिकाणी टोळक्यांच्या विनामास्कने गप्पा रंगलेल्या होत्या. मात्र त्यांना हटकताना कुणीच दिसले नाही. ‘लोकमत’ चमूने कॅमेऱ्यातून फोटो घेतल्याचे लक्षात आल्यावर, काहींनी काढता पाय घेतला. केवळ मोमीनपुरा चौकात पोलिसांची चौकी आणि बंदोबस्तावर पोलीस दिसले. मात्र रात्री ९.१५ नंतरही तेथील गर्दीवर पोलिसांचे कसलेच नियंत्रण दिसले नाही.