डी. एससी. प्रबंधावर १४ वर्षांपासून निर्णय नाही : नागपूर विद्यापीठाला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 10:18 PM2020-02-03T22:18:56+5:302020-02-03T22:22:36+5:30
एका प्राध्यापकाचा डी. एससी. (विज्ञान पंडित) प्रबंध नागपूर विद्यापीठात गेल्या १४ वर्षांपासून धूळ खात पडला आहे. त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. न्यायालयाने सोमवारी नागपूर विद्यापीठाला नोटीस बजावून यावर आठ आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील आणखी एक भोंगळ कारभार पुढे आला आहे. एका प्राध्यापकाचा डी. एससी. (विज्ञान पंडित) प्रबंध नागपूर विद्यापीठात गेल्या १४ वर्षांपासून धूळ खात पडला आहे. त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. न्यायालयाने सोमवारी नागपूर विद्यापीठाला नोटीस बजावून यावर आठ आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. डॉ. उज्ज्वल लांजेवार असे प्राध्यापकाचे नाव आहे. त्यांनी डी. एससी. पदवीकरिता ३० डिसेंबर २००६ रोजी नागपूर विद्यापीठाला प्रबंध सादर केला. त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे लांजेवार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी एम.एससी. व पीएच.डी. पदवी नागपूर विद्यापीठातूनच मिळवली आहे. ते डी.एससी. पदवीकरिताही पात्र आहेत. असे असताना नागपूर विद्यापीठाने त्यांचा प्रबंध प्रलंबित ठेवला आहे. या प्रबंधावर वटहुकूम-१११ अनुसार निर्णय घेणे आवश्यक आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. लांजेवार यांच्यातर्फे अॅड. भानुदास कुलकर्णी व अॅड. पल्लवी मुधोळकर यांनी कामकाज पाहिले.