नागपूर : शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही तकीया धंतोली या वस्तीतील नागरिकांना अद्यापही मूलभूत सुविधा मिळत नाहीत. येथील नागरिकांना रस्ते, पाणी, गटार लाइनच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले आहेत. महानगरपालिकेने या भागातील समस्या सोडविण्याची मागणी ते करीत आहेत.
पाण्यासाठी होते नागरिकांची भटकंती
तकीया धंतोली परिसरात नळलाइन आहे. परंतु या लाइनवरून नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. नळाला नियमित पाणी येत नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना केवळ पिण्याचे पाणी मिळते. वापरण्यासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. याभागातील कूपनलिकाही बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महापालिकेने या भागात पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
गटारलाइन, कचऱ्याची समस्या
या भागातील गटारमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गटार वारंवार चोकअप होत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. नागरिकांनी अनेकदा याबाबत महापालिकेकडे निवेदन दिले. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे. गटार लाइन चोकअप झाल्यामुळे रस्त्यावर घाण पाणी वाहते. पावसाळ्यात हे घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे या भागातील गटारची नियमित देखभाल करण्याची गरज आहे. यासोबतच वस्तीतील नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याची मागणी नागरिक करीत आहेत. या भागात सार्वजनिक ठिकाणी नागरिक कचरा टाकत असल्यामुळे कचरा तसाच पडून राहतो. हा कचरा उचलण्यासाठी कोणीच येत नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. त्यामुळे नियमित कचरा उचलण्याची व्यवस्था महापालिकेने करण्याची गरज आहे.
ग्रंथालय, उद्यानाची गरज
तकीया धंतोली परिसरात ग्रंथालय होते; परंतु मागील काही वर्षांपासून हे ग्रंथालय बंद झाले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्थळच उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांचे यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे महापालिकेने हे ग्रंथालय सुरू करण्याची गरज आहे. याशिवाय परिसरातील लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान नसल्यामुळे लहान मुले रस्त्यावर खेळतात. त्यांचा अपघात होण्याची भीती असून, या भागात उद्यान सुरू करण्याची आवश्यकता आहे.
उच्च दाबाने पाणीपुरवठा करावा
‘कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. त्यामुळे उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्याची गरज आहे.’
-मंगेश सोनवाणे, नागरिक
गटार लाइनची देखभाल करावी
‘तकीया धंतोली परिसरात नेहमीच गटार चोकअप होते. त्यामुळे रस्त्यावर घाण पाणी वाहून दुर्गंधी पसरते. महापालिकेने गटारची नियमित देखभाल करण्याची गरज आहे.’
-दिनेश सिडाम
कूपनलिका दुरुस्त कराव्या
‘नळाला पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांना कूपनलिकेचा आधार वाटतो. परंतु या भागातील बहुतांश कूपनलिका बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यासाठी या भागातील कूपनलिका सुरू करण्याची मागणी आहे.’
-किशोर निखाडे, नागरिक
कचरा नियमित उचलावा
‘नागरिक रिकाम्या जागी कचरा आणून टाकतात. हा कचरा नियमित उचलण्यात येत नाही. त्यामुळे दुर्गंधी पसरते. महापालिकेने हा कचरा नियमित उचलण्याची व्यवस्था करावी.’
-अरुण नेवारे, नागरिक
ग्रंथालय सुरू करावे
‘तकीया धंतोली भागातील सार्वजनिक ग्रंथालय मागील अनेक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. महापालिकेने हे ग्रंथालय सुरू करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.’
-मंगला हंसा, रहिवासी
उद्यान सुरू करावे
‘लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान नसल्यामुळे त्यांची गैरसोय होते. मुले रस्त्यावर खेळत असल्यामुळे त्यांचा अपघात होण्याची शक्यता राहते. त्यामुळे महापालिकेने या भागात उद्यान सुरू करण्याची मागणी आहे.’
-संगीता बागडे, रहिवासी
............