लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १०० व्या नाट्य संमेलनाच्या आयोजनाविषयी कुणीच बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत. नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीने धारण केलेल्या चुप्पीवरून यंदा नाट्य संमेलनाची शंभरी होणार नाही, हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे नव्या दिशानिर्देशानुसार नाट्य परिषदेला नियोजन करावे लागणार आहे. त्याअनुषंगाने कार्यकारिणी कामास लागल्याचेही दिसून येत आहे.२५ मार्च ते १४ जून असा १०० व्या नाट्य संमेलनाचा आराखडा जाहीर झाला होता. मात्र, कोरोना विषाणूने हजेरी लावली आणि शुभारंभाची तारीख येण्यापूर्वीच देशभरात टाळेबंदी झाली. नाट्यगृहे, थिएटर्स, मॉल्स, वाहतूक व्यवस्था सर्वच बंद पडली आणि नाट्यसंमेलन स्थगित करण्याशिवाय पर्याय उरलेला नव्हता. आता टाळेबंदी शिथिल झाली असली तरी कोरोनाचे सावट संपलेले नाही. त्यामुळे ‘नाट्य संमेलनाची शंभरी यंदा नाहीच’ हे जवळपास स्पष्ट झाले आहे. अशा स्थितीत १००व्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने पुढे आलेले पदाधिकाऱ्यांचे हेवेदावे, हेकेखोरपणा आणि आयोजनासंदर्भात परस्पर विरोधाभास, हे सर्व निवळण्यास भरपूर वेळ मिळणार आहे. पुढच्या वर्षीची तयारी कशा तºहेने केली जाणार, काय बदल होणार, नाराजांची मनधरणी केली जाईल का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नाट्य संमेलनाविषयी विचारणा करण्यास पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असताना ते व प्रवक्ते नॉट रिचेबल असल्याचे दिसून आले.
आणि वेळापत्रक पुसले१०० व्या नाट्य संमेलनाचा संपूर्ण आराखडा जाहीर होताच, त्याचे वेळापत्रक नाट्य परिषदेच्या मुंबई कार्यालयात फलकावर लिहिण्यात आले होते. गो.ब. देवल स्मृतीदिनी १४ जून रोजी नाट्य संमेलनाचा समारोपीय सोहळा मुंबईतच पार पडणार होता. मात्र, ना प्रारंभ ना समारोप, काहीच होऊ शकले नाही. अखेर १४ जून रोजी नाट्य परिषद अध्यक्षांनी स्वत: ते वेळापत्रक पुसून काढले .