नागपूर : नागपुरात २० व २१ मार्च रोजी जी-२० अंतर्गत सी-२० या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाचे मान्यवर उपस्थित राहणार असल्याने चोख सुरक्षा बंदोबस्त राहणार आहे. व्हीआयपींची सुरक्षा लक्षात घेता २०-२१ मार्च रोजी नागपुरात ‘नो ड्रोन झोन’ राहणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे, कुठल्याही कार्यक्रमात ड्रोनच्या वापरावर ते दोन दिवस बंदी राहणार आहे.
यासंदर्भात सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांनी निर्देश जारी केले आहेत. या परिषदेला देश विदेशातील अनेक मान्यवर, महत्त्वाचे व्यक्ती नागपूर शहरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांकरिता उपस्थित राहणार आहे. यातील काही मान्यवर व्यक्तींची सुरक्षा व त्यांना असलेला धोका लक्षात घेता नागपूर पोलिसांकडून जागोजागी कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. या मान्यवरांना ड्रोन्स, रिमोट कंट्रोल्ड किंवा रिमोटली पायलट एअरक्राफ्ट्स, पॅराग्लायडर्स, एअरोमॉडेल्स इत्यादींच्या माध्यमातून धोका संभवतो. त्यामुळे सतर्कतेचा उपाय म्हणून नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये 'नो ड्रोन झोन' घोषित करण्यात येत आहे, असे दोरजे यांनी स्पष्ट केले आहे.
चौकाचौकांत राहणार पोलीसदरम्यान, या परिषदेसाठी देशविदेशातील मान्यवर येणार असल्याने पोलिसांकडून विशेष सुरक्षा बंदोबस्त राहणार आहे. शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये सुरक्षारक्षक तैनात राहतील. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, परिषदांचे आयोजन होणारे स्थान, अतिथी भेट देणार असलेल्या ठिकाणी १९ तारखेपासूनच जवान तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय महत्त्वाच्या ठिकाणी सर्व्हेलन्स व्हॅनदेखील तैनात करण्यात येईल. शहरातील विविध चौकांतील सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्व हालचालींवर कंट्रोल रूममधून बारीक लक्ष ठेवण्यात येईल. पोलिसांकडून विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.