नागपूर : महापालिकेत आस्थापना आणि वित्त व लेखा विभाग महत्त्वाचा मानला जातो. मात्र २६०० कोटींचे बजेट असलेल्या मनपाच्या लेखा व वित्त विभागाला पूर्ण वेळ मुख्य लेखा व वित्त अधिकारी नाही. नासुप्रचे वित्त अधिकारी विलीन खडसे यांच्याकडे अतिरिक्त प्रभार आहे. ते नासुप्र कार्यालयात बसतात. कर्मचारी व कंत्राटदारांना नासुप्र कार्यालयात जाऊन त्याच्याकडून फाईलला मंजुरी घ्यावी लागते. मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याने वित्त विभागाचा कारभार ‘रामभरोसे’ सुरू असल्याची मनपात जोरदार चर्चा आहे.
स्टेशनरी घोटाळ्यामुळे आधीच हा विभाग बदनाम झाला आहे. त्यात तत्कालीन लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे सेवानिवृत्त झाल्यापासून हे पद रिक्त आहे. विलीन खडसे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त पदभार आहे. पूर्णवेळ वित्त अधिकारी उपलब्ध नसल्याने अर्थसंकल्प सादर करण्याला विलंब झाला. दुसरीकडे या विभागात अर्ध्याहून अधिक पदे रिक्त असल्याने दुसऱ्या विभागातील २० कर्मचारी व सफाई कर्मचारी या विभागात पाठविण्यात आले आहे. यातील अनेकांना लेखा विभागाच्या कामकाजाची जाणीव नाही. यात एलबीटी, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यात पुढील काही दिवसांत या विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात सेवानिवृत्त होणार असल्याने विभागाच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे.
मागणी करूनही ऑडिटर नाही
लेखा व वित्त विभागात ऑडिटरचे पद महत्त्वाचे मानले जाते. परंतु हे पद रिक्त आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. बिल मंजूर करताना अडचणी येत असल्याने ऑडिटरची नियुक्ती करण्याची वरिष्ठांकडे मागणी केली. मात्र अधिकारी दखल घेत नसल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.