नागपूर : आम्हाला अनुदान नको, आर्थिक मदतही नको पण संत्रा गळतीवर उपाययोजना सांगा. कृषी संशोधन संस्थांना या कामी मदत करायला सांगा, अशा शब्दात नागपूर-अमरावती विभागातील संत्रा उत्पादकांनी त्यांचा संताप पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्या समोर व्यक्त केला.
फळ गळतीमुळे त्रस्त झालेल्या उत्पादकांच्या आग्रहावरुन सोमवारी केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्थेतर्फे फळगळती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार उपस्थित होते. केदार यांच्या भाषणादरम्यान शेतकरी उभे राहिले व त्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या.
आम्हाला अनुदान नको, तंत्रज्ञान द्या, कृषी वैज्ञानिक व शेतकऱ्यांच्या संवाद कार्यक्रमासाठी मंत्र्यांनी वेळ काढावा. आमच्या समस्या समजुन घ्याव्यात, चांगल्या प्रतीच्या कलमा उपब्ध करून द्याव्या, असे शेतकरी म्हणाले. याची दखल घेत केदार यांनी त्यांचे पुढचे पूर्व नियोजित कार्यक्रम पुढे ढकलून शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच, संत्रा उत्पादक शेतकरी, केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्था, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या संस्था मिळून दर महिन्याला कार्यशाळा आयोजित करतील, त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार, अशी ग्वाही पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी दिली. नागपूर व अमरावती विभागातील कृषी अधिकाऱ्यांना त्यांनी उपस्थित सर्व प्रश्नांवर तोडगा काढत आठवड्यात अहवाल सादर करावा, असे आदेशही दिले.