नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. परंतु तिसरी लाट येण्यापूर्वीच प्रवाशांना सुरक्षा देण्यासाठी एसटी महामंडळाने कंबर कसली असून संपूर्ण बसेसमध्ये कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी अँटी मायक्रो बिअल कोटिंग करण्यास सुरुवात केली आहे. नागपूर विभागातील गणेशपेठ आगारातील २२ बसेसला आतापर्यंत ते करण्यात आले आहे.
कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. त्यामुळे एसटीचे उत्पन्नही शून्यावर आले होते. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांचे वेतन कसे द्यावे असा प्रश्न एसटी महामंडळासमोर उभा ठाकला होता. परंतु महाराष्ट्र शासनाकडे असलेल्या विविध सवलतींची रक्कम मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटला होता. आता तिसरी लाट येण्याच्या पूर्वी प्रवासी कमी होऊ नयेत यासाठी एसटी महामंडळाने शक्कल लढविली आहे. एसटीच्या राज्यातील बसेसला अँटी मायक्रो बिअल कोटिंग करण्यात येणार आहे. त्यानुसार हे कोटिंग लावल्यापासून दोन महिन्यापर्यंत एखाद्या प्रवाशाच्या हातावर कोरोनाचे विषाणू असले तरी ते नष्ट होणार आहेत. प्रवासी जेथे हात लावतात अशा सर्व ठिकाणी हे कोटिंग करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातील गणेशपेठ आगारात हे कोटिंग करण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी गणेशपेठ आगारातील २२ बसेसला कोटिंग करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक अनिल आमनेरकर यांनी दिली. कोटिंगचे काम अजूनही सुरू आहे. त्यामुळे आता तिसरी लाट आली तरी नागपुरातून प्रवासी एसटीच्या बसने बिनधास्तपणे प्रवास करू शकणार आहेत.
.................
असे होत आहे कोटिंग
स्प्रेच्या माध्यमातून अँटी मायक्रो बिअल कोटिंग करण्यात येत आहे. बसच्या आतील भागात जेथे-जेथे प्रवाशांचे हात लागतात किंवा त्यांचा संपर्क येतो अशा सर्व भागात हे कोटिंग करण्यात येणार आहे. शिवशाही, आशियाड आणि साध्या बसेसमध्ये हे कोटींग होणार आहे. त्यासाठी बॅक्टी बॅरिअर आणि इतर रसायनांचा वापर करण्यात येणार आहे. हे कोटिंग प्रवाशांना दिसणार नाही. परंतु त्याचा प्रभाव दोन महिन्यापर्यंत राहणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
..................