विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोनदेखील नाही : कसे होणार ऑनलाइन शिक्षण ?
नागपूर : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू आहे, असा आभासी दावा शिक्षण विभाग करीत आहे. पण जिल्ह्यातील २६२० शाळांपैकी ७८४ शाळांमध्ये इंटरनेट सुविधाच नसल्याची सूत्रांची माहिती आहे. इंटरनेटची सुविधाच नसली तर ऑनलाइन शिक्षण कसे सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शाळा बंद शिक्षण सुरू, या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांस शिक्षण दिले जात आहे. खेड्यापाड्यातील अनेक मुलांच्या पाल्याकडे स्मार्टफोन नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांची इंटरनेट रिचार्ज करण्याची परिस्थिती नाही. असे असतानाही ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याचे विभागाकडून सांगण्यात येत आहे. काही शाळेत इंटरनेट सुविधा नसली तरी, शिक्षक आपल्या मोबाइलद्वारे झूम अॅप, गुगल मीटद्वारे ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवित आहे.
-दृष्टिक्षेपात-
जिल्ह्यातील एकूण शाळा - २६२०
इंटरनेट असलेल्या शाळा - १८३६
इंटरनेट नसलेल्या शाळा - ७८४
जिल्हा परिषदेच्या शाळा - १५३०
अनुदानित शाळा - ६५८
विनाअनुदानित शाळा - ४३२
- शिक्षकांच्या मोबाइलचा आधार
शाळेत इंटरनेट सुविधा नाही. त्यामुळे शिक्षकांना स्वत:च्या मोबाइलवरून ऑनलाइन शिक्षण द्यावे लागते. शाळेत इंटरनेट असले तरी, ज्या वेळेत शाळा भरते त्यावेळी ग्रामीण भागातील मुलांच्या हातात मोबाइलच नसतो. त्यांचे पालक मोबाइल घेऊन जातात. त्यामुळे शिक्षकांना त्यांच्या घरूनच पालकांच्या सोयीनुसार सकाळी अथवा सायंकाळी मोबाइलद्वारे ऑनलाइन शिक्षण द्यावे लागते.
- काय म्हणतात शिक्षक
- मोबाइलद्वारे आकृती, प्रतिकृती शिकविणे अवघड आहे. गणितासारखा विषय मोबाइलवर समजावून सांगणे अवघड आहे. पण पर्याय नाही. शाळेत इंटरनेट असणे किंवा नसणे त्याचा ऑनलाइन शिक्षणाशी संबंध नाही. मुळात मुलांजवळ ती सोय साधने असायला हवी.
- राजेश ठाकरे, शिक्षक
खरे तर ऑनलाइन शिक्षण प्रभावी नाही. शाळेत जाऊन बसणे, तिथून ऑनलाइनद्वारे विद्यार्थ्यांना शिकविणे यातून फारसे काही साध्य होत नाही. खरे तर विद्यार्थी शाळेत यायला हवेत, प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन व्हायला हवे.
- सुनील लांजेवार, शिक्षक
शासनाच्या निर्देशानुसार शिक्षण सुरू आहे
गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद आहे. शासनाकडून शिक्षण सुरू करण्यासंदर्भात वेळोवेळी दिशानिर्देश येतात. त्यानुसार शिक्षकांना सूचना देण्यात येतात. जिल्ह्यात ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.