लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आधुनिक जगतात विवाह आता दोन जीवांच्या भावी आयुष्याच्या व्यवहाराचा एक भाग झाला आहे आणि याबाबतीत कुणाचेही दुमत नसेलच. कोरोना संक्रमणामुळे मात्र, या लगबगीला ब्रेक लागत असल्याचे चिन्ह आहेत. अनेकांनी आपले विवाह लांबणीवर ढकलले आहेत. शिक्षण कितीही उच्च असले तरी नोकरीची शाश्वती राहिली नाही. कितीही मोठा व्यवसाय असेल तर त्यात सध्या तरी टिकाव लागेल, हे आश्वासन देता येत नाही आणि जीवाची तर शाश्वती तशीही नव्हतीच आणि कोरोनाच्या धास्तीत तर ती आणखीनच देता येत नाही. अशा स्थितीत अनेकांनी विवाह लांबणीवर ढकलल्याचे दिसून येत आहे.
अनेकांच्या अपेक्षा बदलल्या
परमेश्वराने जन्म दिला तर पोट भरण्याची व्यवस्थाही तोच करतो, अशी भाबडी समज सर्वत्र आहे. नेमका हाच दुवा गृहीत धरत अनेकांनी वर्तमान परिस्थतीचा विचार करत आपल्या अपेक्षांना लगाम लावत, केवळ अनुरूप जोडीदार मिळविण्यावर भर दिला आहे. जसे मुलगा अमुक ठिकाणचाच हवा, नोकरीत पगार एवढाच हवा, नोकरीच्या ठिकाणी त्याचे स्वत:चे घर असावे, कार असावी अशा अपेक्षा आता सौम्य झालेल्या दिसतात.
अनेक जण आपल्या अपेक्षांवर अजूनही ठाम
विवाहासाठी अनेक वर-वधू आपल्या अपेक्षांवर अजूनही ठाम आहेत. उच्च शिक्षण, अपेक्षित पगार मिळेपर्यंत लग्न नको असे म्हणताना आधीच वय वाढलेले आहे. त्यात कोरोनामुळे मागे का हटायचे, असा प्रश्न उपस्थित करत उशीर झाला तरी चालेल, अपेक्षित वर-वधू मिळेपर्यंत लग्न नकोच, या विचारावर अनेक जण ठाम आहेत.
वर्क फ्रॉम होम वाले आणखी थांबण्यास इच्छुक
बऱ्याच कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिले आहे आणि आगामी काळात हा वेळ आणखी वाढविण्याचा मानस व्यक्त केला जात आहे. याच स्थितीत नुकसान झाल्याने अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. त्यामुळे, वर्क फ्रॉम होम करत असलेले कर्मचारी कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे, विवाहाचा विचार करण्यास ते सध्या तरी तयार नाहीत.
विचारांत कोणताच बदल झालेला नाही
कोरोनामुळे अनेक अडचणी, संकटे अनेकांनी भोगल्या आहेत. मात्र, विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो आणि त्यामुळे, त्याबाबत कुणीच तडजोड करण्यास इच्छुक नाहीत. शिक्षण, नोकरी, पगार, कुटुंब, संस्कृती आणि स्थळाबाबत सगळ्यांच्या अपेक्षा पूर्वीप्रमाणेच असल्याचे दिसून येते.
- सुप्रिया केकतपुरे, अनुरूप विवाह संस्था, नागपूर
....................