योगेश पांडे
नागपूर : आगामी निवडणूकांच्या जागांवरून भाजप व शिवसेना (बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यातील लोकप्रतिनिधींमध्ये असंतोष निर्माण झाल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पुढील १५ वर्षे राज्यात भाजप-सेना युतीचेच सरकार असेल. जागांवरील दाव्यावरून कुठलीही नाराजी नाही. राज्यातील जागावाटप हे केंद्रीय संसदीय मंडळ तसेच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या समन्वयातून होईल. जागावाटपाचा अधिकार राज्यातील कुठल्याही नेत्याला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
भाजपला शिवसेनेतील काही मंत्री नको आहेत, अशा चर्चा रंगल्या आहेत. मात्र भाजपा कुणाच्याही अधिकारांमध्ये हस्तक्षेप करत नाही. शिवसेनेतील कुणाला मंत्री करायचे, काढायचे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अधिकार आहे. आम्ही त्यात नाक खुपसणार नाही. विरोधकांकडून भाजप-सेना युतीच्या आमदारांमध्ये असंतोष व अस्वस्थता निर्माण व्हावा यासाठी ही गाजराची पुंगी सोडली असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला.
वारीवरून विरोधकांनी राजकारण टाळावेमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व राजकीय पक्षांना वारीतील घटनेचे राजकारण करू नये असे आवाहन केले होते. त्यांनी तेथील तथ्यदेखील मांडले होते. विरोधकांनी या विषयावर राजकारण करू नये. वारकरी जनता ही सर्वात महत्त्वाची आहे याचे भान राजकीय पक्षांनी ठेवावे व राजकारणाची परंपरा कायम ठेवावी, विरोधकांना राजकारण करायचे असेल तर आम्ही काय म्हणणार, असे बावनकुळे म्हणाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याहून भयंकर प्रकार झाले होते. सर्व पक्षांनी त्यावेळी सहकार्य केले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नवनवीन जबाबदाऱ्या मिळाल्याने ते उत्साहात आहे. मात्र त्यांनी सरकारच्या आवाहनाचा मान राखला पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले.
विरोधी बाकांवर आल्यावर राष्ट्रवादीला मुस्लिम, ओबीसी दिसतातकॉंग्रेस-राष्ट्रवादी सत्तेबाहेर गेल्यावर ते समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. शरद पवार, बंटी पाटील यांचे वक्तव्य आले आणि संभाजीनगर, कोल्हापुरात तणाव निर्माण झाला. सत्तेत असताना कॉंग्रेस-राष्ट्रवादीला केवळ व्यापारी व उद्योगपती दिसतात. मात्र विरोधी पक्षात गेल्यावर मात्र मुस्लिम, ओबीसी, मागासवर्गीय समाजाची आठवण येते व समाजात कलह निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, असा आरोप बावनकुळे यांनी लावला.