योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागातून वाकाटकालीन मौल्यवान नाणी व अन्य पुरातन वस्तूंच्या संशयास्पदरीत्या गायब होण्याच्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाला प्रसारमाध्यमांनी उघडकीस आणून पावणेदोन वर्षांचा कालावधी झाला आहे. मात्र अद्यापपर्यंत या प्रकरणात ना नागपूर विद्यापीठाने ठोस कारवाई केली आहे, ना पोलीस विभागाला आरोपी सापडले आहेत. या प्रकरणातील ‘लिंक’ अद्यापदेखील सापडली नसल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.१९६७ साली पवनारजवळील शेतात सापडलेली २०० हून अधिक नाणी विभागात नसल्याची बाब ‘लोकमत’ने मागील वर्षी उघडकीस आणली होती. याबाबत तत्कालीन प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी चौकशी समिती गठित केली होती. या समितीने अहवाल सादर केला होता. परंतु हे प्रकरण प्रसिद्धीमाध्यमांमध्ये आल्यानंतर हा अहवालच सापडत नव्हता. हा अहवाल सापडल्यानंतर विभागातून २१६ नाणी तसेच अनेक दुर्मीळ वस्तू गायब झाल्याचे स्पष्ट झाले होते. याबाबत विद्यापीठाने बऱ्याच कालावधीनंतर पोलीस तक्रार दाखल केली. मात्र संबंधित नाणी गहाळ झाल्याची विद्यापीठाने तक्रार केली होती. नाण्यांच्या तपासाला वेग यावा, यासाठी विद्यापीठाने चोरीची तक्रार दाखल करावी अशी सूचना करणारे पत्र पोलिसांनी विद्यापीठाला दिले होते. मात्र, त्या पत्राला विद्यापीठाने उत्तरच दिले नव्हते. यामुळे अखेर पोलीस अधिकाऱ्यांनी सोमवारी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी भेट घेऊन पोलिस तक्रार करण्याची सूचना केली. त्यानंतर विद्यापीठाने नाणेचोरीची तक्रार दाखल केली होती.तक्रार दाखल झाल्यानंतर अंबाझरी पोलीस ठाण्याच्या एका ‘एपीआय’कडे तपासाची जबाबदारी देण्यात आली. संबंधित ‘एपीआय’ने सखोल चौकशी केली व संबंधित प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात यावे, असा अहवालदेखील दिला. परंतु हे प्रकरण अद्यापही अंबाझरी पोलीस ठाण्याकडेच आहे. यासंदर्भात अंबाझरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक भीमराव खंडाळे यांच्याशी संपर्क केला असता अद्याप चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची ‘लिंक’ अद्याप सापडलेली नाही. नाणी नेमकी कुठे गेलीत हा मोठा मुद्दा आहे. याबाबतीत माजी विभागप्रमुख डॉ.प्रदीप मेश्राम यांची चौकशी झाली असून त्यांच्याकडून काही कागदपत्रेदेखील ताब्यात घेण्यात आली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. आश्चर्याची बाब म्हणजे या नाण्यांची नेमकी किंमत किती असू शकते, याचा अंदाज पोलिसांनादेखील आलेला नाही.
खेडीकर यांनी सोपविली महत्त्वाची कागदपत्रेया प्रकरणात छायाचित्रकार वंदना खेडीकर यांचे नाव गोवण्याचादेखील प्रयत्न झाला होता. खेडीकर या सध्या पुण्यातील एका महाविद्यालयात प्राचार्य म्हणून ‘लीन’वर गेल्या आहेत. मात्र त्यांनी या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे पोलिसांना सोपविले आहेत. त्यांनीच या नाण्यांची अखेरची छायाचित्रे काढली होती. मात्र असे करत असताना त्यांनी माजी विभागप्रमुखांची सर्व यादीवर स्वाक्षरी घेतली होती. हे कागद त्यांनी गायब होण्याच्या भीतीने विद्यापीठाला सोपविले नाहीत. कुलगुरूंना मात्र त्यांनी याची कल्पना दिली होती. कुलगुरूंनी परवानगी दिल्यानंतर त्यांनी पोलिसांना ही मूळ कागदपत्रे सोपविली. विभागात ती नाणी असल्याचे यातून स्पष्ट झाले. मात्र इतका मोठा पुरावा असूनदेखील डॉ.प्रदीप मेश्राम यांची पोलिसांकडून केवळ जुजबी चौकशीच का करण्यात आली हे कोडेच आहे.
विभागप्रमुखांवर कारवाई का नाही ?कुलगुरूंनी यासंदर्भात स्वत: चौकशीला सुरुवात केली होती व विभागप्रमुख डॉ.प्रीती त्रिवेदी यांच्याकडून अहवाल मागवून घेतला होता. त्यानंतर माजी विभागप्रमुख डॉ.प्रदीप मेश्राम, विभागातील ‘क्राफ्टमन’ सहारकर तसेच छायाचित्रकार वंदना खेडीकर यांना बोलावून विचारणादेखील केली होती. यावेळी विभागात नोंद न होता नाणी ठेवण्यात आली होती ही बाब स्पष्ट झाली होती. प्राथमिक चौकशीच्या आधारावर विभागातील नाणी गायब झाल्याचा निष्कर्ष कुलगुरूंनी काढला होता. असे असतानादेखील माजी विभागप्रमुखांवर तत्काळ कारवाई करण्यात आली नाही. डॉ.मेश्राम हे निवृत्त झाले व त्यांचे निवृत्तीवेतन विद्यापीठाने थांबविले होते. मात्र त्यांनी विद्यापीठाला कायदेशीर नोटीस बजावली होती. यासंदर्भात आम्ही कायदेशीर सल्ला घेतला. नियमांनुसार निवृत्तीवेतन थांबविता येत नाही, असे आम्हाला अधिवक्त्यांनी सांगितले. त्यानुसार त्यांना ‘नो ड्यू सर्टिफिकेट’ देणे क्रमप्राप्त होते. पुढे नेमके काय झाले हे माहीत नाही. परंतु ही नाणी विभागातून गहाळ झाली आहेत, हे मात्र मी केलेल्या चौकशीतदेखील स्पष्ट झाले होते. आता पोलिसांकडे प्रकरण असून तेच यामागील सूत्रधार शोधतील, असे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी स्पष्ट केले.राजकीय दबावामुळे तपास संथया प्रकरणात पोलीस आयुक्त के.वेंकटेशम यांनी स्वत: पुढाकार घेत हे प्रकरण गुन्हे शाखेला सोपविण्याची सूचना केली होती. प्रकरणाची फाईल अंबाझरी पोलीस ठाण्यातून गुन्हे शाखेकडे पाठविण्यात आली. मात्र लगेच ती फाईल परत आली. शहरातील एका आमदाराने तपास अंबाझरी पोलीस ठाण्याकडेच राहू द्यावा, यासंदर्भात दबाव आणला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांनीदेखील या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तसेच याची चौकशी ‘सीबीआय’ने करावी, अशी मागणी केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही किंमत आंतरराष्ट्रीय तस्करी बाजारात अनेक कोटींमध्ये आहे. अशा स्थितीत ही नाणी नागपुरात असण्याची शक्यता फारच कमी असून जगभरात कुठेही याची विक्री झालेली असू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.