नरेश डोंगरे - नागपूर : कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेच्या परिवहन विभागाने शहरात गेल्या तीन वर्षात २३० बस थांबे बांधले. विशेष म्हणजे, हे सर्वच्या सर्व बस थांबे महापालिकेने काढूनही टाकले. परिवहन विभागाकडून या धक्कादायक प्रकाराची माहिती उपलब्ध झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
झपाट्याने वाढणाऱ्या नागपूर शहरात महापालिकेकडून शहर बससेवेचे (ऑपरेटरच्या माध्यमातून) संचालन केले जाते. शहराच्या विविध भागातील प्रवाशांना या बस सेवेचा माफक दरात लाभ मिळतो. त्यामुळे रोज हजारो प्रवासी या बसची वाट वेगवेगळ्या भागात पहात असतात. उन, वारा, पाऊस यापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे म्हणून महापालिकेच्या परिवहन विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी विविध भागात बस थांबे बांधले आहेत. मात्र, शहरात काल-परवापर्यंत दिसणारे बस थांबे एक एक करून हळूहळू गायब होत असल्याचे प्रकार घडत आहेत.
चांगले लोखंडी साहित्य वापरून बांधण्यात आलेले आणि वरकरणी मजबूत दिसणारे हे बस थांबे कुणी चोरून नेले, की हवेमुळे उडून गेले, की कुणी छुमंतर करून बस थांबे गायब केले, असे प्रश्न स्वाभाविकपणे नागरिकांना पडत होते. त्या संबंधाने सर्वत्र चर्चा होत आहे. कुणाकडून तक्रार तर कुणाकडून विचारणाही केली जात आहे. महापालिकेच्या परिवहन विभागाकडे या संबंधाने माहितीच्या अधिकारात विचारणा केली असता धक्कादायक माहिती उघड झाली.
प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे यांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२१ ते २० मे २०२४ या कालावधीत महापालिकेच्या परिवहन विभागाकडून २३० बस थांबे (शेड) बांधून घेण्यात आले. मात्र, त्याचा उपयोग होत नसल्यामुळे ते सर्वच्या सर्व २३० थांबे काढूनही टाकण्यात आले आहे.हा बस थांब्याचा घोटाळा का ?अधिकृतपणे उपलब्ध झालेल्या या माहितीमुळे विविध प्रश्न चर्चेला आले आहे. संबंधित ठिकाणी बस थांबे बांधण्याची आवश्यकता महापालिकेला कुणी लक्षात आणून दिली होती आणि कोट्यवधींचा खर्च करून तीन वर्षांत बांधण्यात आलेल्या या २३० पैकी एकाही थांब्याचा उपयोग होत नसल्याचा अविष्कार महापालिकेच्या परिवहन विभागाला कसा झाला, असा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे, बांधण्यात अलेल्या बस थांब्यांना काढून टाकण्यासाठी किती रुपयांचा खर्च करण्यात आला, असाही प्रश्न असून बस थांबे बांधण्याचा, काढून टाकण्याचा कोट्यवधींचा हा घोटाळा तर नाही ना, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.