लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला अक्षय तृतीया सण हिंदू धर्मात मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दिवशी लग्नकार्य वा नवीन वस्तू खरेदीसाठी मुहूर्त पाहिला जात नाही. या दिवशी सर्व कार्यक्रम उत्साहाचे साजरे होतात. त्यातच सर्व समाजातर्फे सामूहिक विवाह सोहळे पार पडतात. गरीब असो वा श्रीमंत सर्वस्तरातील लोक या दिवशी घरचे लग्नकार्य उत्साहाने करतात; पण गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कोरोना लॉकडाऊनचे सावट असल्याने यंदा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला असून लग्नसोहळे लॉकडाऊन झाले आहेत.
खर्चाला फाटा देण्यासाठी अनेक जण सामूहिक विवाहात लग्नकार्य करतात; पण यंदा लॉकडाऊनमुळे लग्नकार्य केवळ २५ जणांच्या उपस्थितीत होणार असल्याने सर्वांची निराशा झाली आहे. मे महिन्यात जवळपास दहा मुहूर्त आहेत; पण आता सर्वच मुहूर्त हुकले आहेत. अनेकांनी मे महिन्यातील लग्नकार्य पुढे ढकलल्याने मंगल कार्यालय संचालकांची अडचण झाली आहे. याशिवाय जून महिन्यातही लग्नकार्य होणार की नाही, यावरही शंका आहे. त्यामुळे लग्नकार्यासाठी मंगल कार्यालय, लॉन आणि हॉटेल बुक केलेल्या अनेकांनी बुकिंगची रक्कम परत मागितली आहे. त्यामुळे संचालकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. याशिवाय जून महिन्यातील लग्न रद्द करून अनेकांनी बुकिंगची रक्कम परतीसाठी अर्ज केले आहेत. अनेक जण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज करीत असल्याची माहिती आहे. खर्च तेवढाच पण उत्पन्न काहीच नसल्याने मंगल कार्यालय व लॉन संचालकांना आर्थिक नुकसान होत आहे. लॉकडाऊनमुळे दुकाने बंद असल्याने अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर विविध बाजारपेठांमध्ये होणारी खरेदीही थांबली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना आर्थिक उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. लॉकडाऊनमध्येही लोक घरीच लग्नकार्य करीत आहेत.
मे महिन्यात सर्वाधिक मुहूर्त
यंदा मे महिन्यात जवळपास दहा मुहूर्त होते. शिवाय अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त समजला जातो. राज्य शासनाने ३१ मेपर्यंत पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केल्याने मे महिन्यात मंगल कार्यालय वा लॉनमध्ये लग्नसमारंभ होणार नाहीत. मे महिन्यात २ मे, ३, ४, १४, १६, २०, २२, २६, ३० आदी तारखांना लग्नाचे मुहूर्त होते; पण लॉकडाऊनमुळे यंदा सार्वजनिकरीत्या लग्नकार्य होणार नाही.
मंगल कार्यालयांचे गणित बिघडले :
- शहरात जवळपास ३०० पेक्षा जास्त लहान-मोठे मंगल कार्यालये व लॉन.
- गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही लॉकडाऊनमुळे आर्थिक गणित बिघडले.
- संचालक बुकिंगची रक्कम काही टक्के रक्कम कापून करताहेत परत.
- मंगल कार्यालयांचे उत्पन्न शून्य तर खर्च ‘जैसे थे’.
- डेकोरेशन, कॅटरर्स, बॅण्ड, घोडे, सजावट आदींना फटका.
- हजारो लोकांचा रोजगार बुडाला.
कार्यक्रमांना नियमांचा अडसर
लॉकडाऊनमध्ये शासनाच्या नियमाशिवाय कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही. सभा, सार्वत्रिक कार्यक्रमांवर बंदी टाकली आहे. शिवाय लग्नकार्य २५ जणांच्या उपस्थितीत करण्याला परवानगी आहे. त्यामुळे अनेकांनी मे महिन्यात होणारे लग्न कार्य रद्द करून पुढे ढकलले आहेत. तर अनेकांचा घरीच साजरा करण्यावर भर आहे. यामुळे खर्चावर आळा बसत असल्याचे अनेकांचे मत आहे.
यंदाही कर्तव्य नाही
लॉकडाऊनमध्ये यंदाही कर्तव्य नाही. लग्नकार्य २५ जणांच्या उपस्थितीत करण्याचे शासनाचे बंधन असल्याने लग्न होणे शक्य नाही. त्याकरिता काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
-संजय खानोरकर, वधूपिता.
लॉकडाऊनच्या काळात आणि २५ जणांच्या उपस्थितीत लग्नकार्य करणे शक्य नाही. कोरोना रुग्ण कमी झाल्यानंतरही शासनाचे नियम शिथिल होण्याची काहीही शक्यता नाही.
-रमेश लांजेवार, वरपिता.