लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूरसह राज्यातील अनेक ठिकाणी मास्क बंधनकारक केले आहे. परंतु अनेकजण अजूनही मास्क वापरत नसल्याचे दिसून येत आहे. शहरात कोरोना पॉझिटिव्हची वाढती संख्या लक्षात घेता, पेट्रोलपंप चालकांनी आता मास्क घातला नसेल तर पेट्रोल मिळणार नाही, अशी मोहीम राबविली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पेट्रोलपंप चालक ही काळजी घेताना दिसत आहे. २४ मार्चपासून शहर लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाच्या बजावापासून आवश्यक उपाययोजना करण्यासाठी प्रशासन काळजी घेण्याचे आवाहन करीत आहे. वारंवार हात धुवा, हाताला सॅनिटायझरने स्वच्छ करा, मास्कचा वापर करा अशा सूचना प्रशासन व आरोग्य विभागाकडून दिल्या जात आहे. असे असतानाही अनेकजण घराबाहेर पडताना, शहरात फिरताना मास्कचा वापर करीत नाहीत. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मास्क आवश्यक असून, प्रत्येकाने घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, यासाठी पेट्रोलपंप चालकांनीच पुढाकार घेतला आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांनी मास्क जर घातला नसेल, तर त्यांना पेट्रोल मिळणार नाही, असे बोर्ड पेट्रोल पंपावर लावण्यात आले आहे. पेट्रोल पंपावरील कर्मचारीही प्रत्येकाला मास्कचा वापर करण्याची विनंती करीत आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक चांगला नियम पेट्रोलपंप चालकांकडून राबविला जात आहे.
नो मास्क, नो पेट्रोल ! नागपुरातील पेट्रोल पंप चालकांची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 8:34 PM