नागपूर : महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रोड शो करणाऱ्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना संघ मुख्यालयाजवळील चौकात भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखविले. प्रत्युत्तरात प्रियांका गांधी यांनी झेंडे दाखविणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र, काहीही केले तरी येथे महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार, असे वक्तव्यही झेंडे दाखविणाऱ्यांना उद्देशून त्यांनी केले. बडकस चौकात हा प्रकार घडला.
मध्य नागपूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारार्थ प्रियांका गांधी यांचा रोड शो होता. सायंकाळी ५:४० च्या सुमारास रॅली बडकस चौकात आली. येथील एका मिष्टान्न भांडारच्या इमारतीवर भाजपचे कार्यकर्ते उभे होते. त्यांनी प्रियांका यांना भाजपचे झेंडे दाखविले. ते पाहून त्यांनी त्यांना नमस्कार केला. तसेच माईक हातात घेऊन ‘झेंडे दाखविणाऱ्या कार्यकर्त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र, काही केले तरी येथे मविआचाच उमेदवार निवडून येणार,’ असे वक्तव्य त्यांनी केले.
दुसरीकडे उजव्या बाजूला भाजपचे कार्यकर्ते प्रचार रॅली घेऊन पुढे जात होते. त्यांनी तिथेच थांबून घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने येथे काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. कार्यकर्ते जुमानत नसल्याने त्यांना पोलिसांनी मागे रेटण्यास सुरुवात केली. दरम्यान, १५ मिनिटांनंतर वातावरण शांत झाले.
बहिणींनो, तुम्ही देश बदलवू शकता, सत्ता बदला
देसाईगंज (जि. गडचिरोली) : बहिणींनो, ही निवडणूक तुमच्या मुद्यांवर, तुमच्या समस्यांवर लढली जायला हवी. पाणी, वीज, महागाई, बेरोजगारी या तुमच्या समस्या आहेत. तुम्ही या देशाची जनता आहात आणि तुमचा विकास होतोय की नाही, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. माझ्या बहिणींनो, तुम्ही या देशाची शक्ती आहात. स्वत:ला कमजोर समजू नका. स्वत:ची शक्ती ओळखा. तुम्ही देश बदलवू शकता. सत्ता बदला, अशी भावनिक साद काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी घातली.
आम्ही बोलायला गेलो तर त्यांना भिवापुरी मिरची झोंबते!
उमरेड : पैशाच्या भरवशावर वाट्टेल ते केले. या सरकारने १६ लाख कोटी रुपये श्रीमंतांचे माफ केले. शेतकऱ्यांवर अन्याय केला, अशा शब्दांत तोफ डागत आम्ही बोलायला गेलो तर भिवापुरी मिरची झोंबते असा प्रहार काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारवर केला.
उमरेड, सांगली येथे खरगे यांनी रविवारी प्रचारसभा घेतल्या. लोकसभेत जनतेने धडा शिकवला. आता त्यांच्या सरकारला सत्तेत राहण्यासाठी बिहारचे नितीशकुमार आणि आंध्रचे चंद्राबाबू नायडू हे टेकू हवे आहेत. या दोघांनी माघार घेतली तर सरकार कोसळेल. ही कमाल महाराष्ट्राने केल्याचे ते म्हणाले.